कितीही अडचणी आणल्या तरी राजगडचा गड अभेद्यच राहणार; माजी आमदार संग्राम थोपटेंचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 09:50 IST2025-09-26T09:49:52+5:302025-09-26T09:50:20+5:30
- राजगड सहकरी साखर कारखान्याची सभा उत्साहात

कितीही अडचणी आणल्या तरी राजगडचा गड अभेद्यच राहणार; माजी आमदार संग्राम थोपटेंचा विश्वास
भोर : राजगड सहकारी साखर कारखान्याला कोणी कितीही अडचणी आणल्या तरी राजगडचा गड होता. आणि अभेद्यच राहणार, असे प्रतिपादन राजगड सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
राजगड सहकरी साखर कारखाना ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्या वेळी थोपटे बोलत होते. यावेळी युवा नेते पृथ्वीराज थोपटे, पोपट सुके, शिवाजी कोंडे, के. डी. सोनवणे, शैलेश सोनवणे, उत्तम थोपटे, सुधीर खोपडे, दिनकर धरपाळे, सुभाष कोंढाळकर, विकास कोंडे, अभिषेक येलगुडे, प्रताप शेळीमकर, विजय गरुड, अशोक शेलार, नितीन बांदल, दत्तात्र्य चव्हाण, विजय शिरवले, माउली पांगारे, सोमनाथ वचकल, अरविंद सोंडकर, शिवाजी नाटबे, शिवाजी सासवडे, अमित दरेकर, बाळासाहेब गरुड, संतोष धावले, अतुल किंद्रे, प्रसाद शिंदे उपस्थित होते.
अहवाल वाचन प्रभारी कार्यकारी अधिकारी भागवत आहाड यांनी केले. सभेपुढे नऊ विषय मांडण्यात आले. त्या सर्वांना एकमताने मंजुरी देण्यात आली. राजगडला कर्ज मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार संग्राम थोपटे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राजगड कारखाना उभारणीसाठी ३५७ कोटी रुपये, तर कारखान्याच्या भागभांडवल ११० कोटी असे एकूण ४६७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यात ३५०० मे.टन क्षमतेचा कारखान्याच्या वतीने १४.५ मेगावॉट वीजनिर्मिती केली जाणार आहे. डिस्टिलरी प्लांट करण्यात येणार आहे. मागील ३५वर्षांत अनेकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणी कितीही त्रास दिला तरी राजगडचा गड अभेद्य होता आणि अभेद्यच राहणार.
मुख्यमंत्र्यांच्या मदतीमुळे कामगारांना सुगीचे दिवस
कारखान्याने १७ कोटींचे कर्ज फेडले. मात्र, राजगड वाहतूक सहकारी संस्थेला जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जामुळे कारखाना अडचण आणण्यासाठी व उपसा जलसिंचन योजना, कालव्यांची कामे अपूर्ण ठेवून काहींनी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी कारखान्याला राज्यात सर्वांत अधिक आर्थिक मदत केली. यामुळे शेतकरी व कामगार यांना सुगीचे दिवस येणार असून, विरोधकांना एकप्रकारे चपराक दिली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असून भविष्यात पाणी उचलून आधुनिक पद्धतीने सरी आणि पट्टा पद्धतीने ऊसलागवड करून कारखाना पूर्ण क्षमतेने चालवू, त्यासाठी १२ ते १८ हजार एकर लागवड करावी लागणार असून, त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचे संग्राम थोपटे म्हणाले.