ना सुरक्षेची हमी ना कोणाच्या जबाबदारीची,केवळ हमीपत्राच्या आधारे लोकांच्या जिवाशी खेळ ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 13:39 IST2025-11-25T13:36:57+5:302025-11-25T13:39:33+5:30
- हवेली तालुक्यातून अयोध्येला गेलेल्या यात्रेत वृद्ध बेपत्ता झाला होता, तर दुसऱ्या काशी यात्रेतून परतताना एकाचा हृदयविकाराचा मृत्यू झाला. या घटनांमुळे धार्मिक यात्रांमधील नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ना सुरक्षेची हमी ना कोणाच्या जबाबदारीची,केवळ हमीपत्राच्या आधारे लोकांच्या जिवाशी खेळ ?
- दुर्गेश मोरे
पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून प्रचाराला सुरुवातदेखील केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक क्लृप्त्याही लढवल्या जात आहेत. सध्या तर धार्मिक यात्रेचे मोठे पेव फुटले आहे. हवेली तालुक्यातून अयोध्येला गेलेल्या यात्रेत वृद्ध बेपत्ता झाला होता, तर दुसऱ्या काशी यात्रेतून परतताना एकाचा हृदयविकाराचा मृत्यू झाला. या घटनांमुळे धार्मिक यात्रांमधील नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, स्वत:च्या फायद्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या यात्रांमध्ये ना सुरक्षेची हमी ना कोणाच्या जबाबदारीची. विशेष म्हणजे हमीपत्राच्या आधारे लोकांच्या जिवाशी खेळ जोमात सुरू आहे.
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे. सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीमुळे शहरातील वातावरण तापले असले तरी त्याची झळ ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणांमध्ये बसू लागली आहे. महायुती आणि महाआघाडीसह इतर पक्षांनीसुद्धा इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. इच्छुकांनी तर प्रचारासाठी कंबर कसली आहे. सोशल मीडिया असो अथवा सार्वजनिक ठिकाणचे कार्यक्रम जिथे तिथे आपलीच हवा करण्याचा धडाका लावला आहे. महिला मतदारांसाठी होम मिनिस्टर, पैठणीचा खेळ गावागावात रंगत आहे. याशिवाय धार्मिक यात्रांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यावर सर्वच इच्छुकांनी भर दिला आहे. त्यातल्या त्यात हवेलीतील इच्छुकांनी थेट उज्जैन, काशी आणि अयोध्या यात्रेवर लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत बहुतांश मतदारांना देवदर्शन घडवले.
अलीकडे आयोजित केलेल्या धार्मिक यात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा झाल्याचे घडलेल्या दोन-तीन घटनांवरून समोर आले आहे. हवेलीतील एका इच्छुक उमेदवाराने काही दिवसांपूर्वी अयोध्येची यात्रा आयोजित केली होती. त्यासाठी नियम व अटीसह काही घडले तर त्याची जबाबदारी स्वत:ची राहील असा उल्लेख असलेले हमीपत्र यात्रेत सहभागी होणाऱ्यांकडून लिहून घेण्यात आले. यात्रा सुरू झाली. धार्मिक स्थळावर पोहोचली त्यानंतर परतीचा प्रवास सुरू करण्याची वेळ आली, त्यावेळी त्यातील हिंगणगाव येथील शंकर बरकडे (वय ६०) हे बेपत्ता झाले. सर्वांचीच तारांबळ उडाली. अयोध्येतील स्थानिक पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवण्यात आली, तर त्यानंतर अन्य एका उमेदवाराने काशी यात्रा आयोजित केली होती. त्यामध्येही परतीचा प्रवासात पुण्याजवळ आल्यानंतर एका भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनांमुळे धार्मिक यात्रांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकांच्या श्रद्धेआड चाललाय खेळ
सध्याच्या काळामध्ये विशेष करून ग्रामीण भागामध्ये लोकांचा कल धार्मिकतेकडे आहे आणि हेच हेरून काही इच्छुकांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी धार्मिक यात्रा घडवत आहेत. याचे सर्वाधिक प्रमाण शिरूर-हवेली तालुक्यात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत उज्जैनचा बोलबाला होता. तोच कित्ता हवेलीतील इच्छुकांनी गिरवण्यास सुरुवात केली आहे. उज्जैनबरोबरच अयाेध्या आणि काशीचा त्यात समावेश झाला. महत्त्वाचे म्हणजे यावर कोणाचाही अंकुश नाही. केवळ स्वत:च्या फायद्यासाठी लोकांना धार्मिक यात्रेचे गाजर दाखवून काम मार्गी लावण्याचा नवा उद्योग सुरू आहे.
यात्रेतून परतलेल्या ८ भाविकांची प्रकृती अस्वस्थ
धार्मिक यात्रांमध्ये जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षितता आणि त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा प्रश्न गंभीर बनला आहे. बेपत्ता आणि एकाचा हृदयविकाराने झालेला मृत्यू या घटना ताज्या आहेतच; पण आणखी एक घटना अशी की, यात्रेवरून परतलेल्या सात ते आठ भाविकांची प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना थेट खासगी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. वास्तविक खर्च संबंधित आयोजकच करणार, पण याची वाच्यता कुठेही होऊ नये म्हणून याचीही खबरदारी घेण्यात येत आहे. ज्या ठिकाणी उपचार सुरू आहे त्या ठिकाणी आयोजकांचे लाेक ठाण मांडून बसले असून, संबंधितांना इतरांना भेटण्यास मज्जाव करत असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, अजून एका इच्छुक उमेदवाराच्या यात्रेतील दोन ते तीन भाविक बेपत्ता झाल्याची चर्चा आहे.
भाविकांचे हाेतेय हाल
टूर ॲण्ड ट्रॅव्हल्स कंपनीकडून धार्मिक सहलीचे आयोजन केले जाते. मात्र, त्यामध्ये मॅनेजर, केटरिंग सेवा देणारे, त्याचबरोबर इतर लोकांचा सहभाग असतो. याउलट खासगी व्यक्तींकडून आयोजित केलेल्या सहलींमध्ये अपवाद वगळता या गोष्टींची कमतरता जाणवते. आज उज्जैन, अयोध्या, काशी, तुळजापूर, अक्कलकोट, अंबाबाई, आमदापूर श्री स्वामी समर्थ केंद्र त्र्यंबकेश्वरसह अष्टविनायक यात्रांचे आयोजन केले जात आहे; पण त्यामध्ये भाविकांचे हाल होत आहेत. यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांकडून समस्यांचा पाढा वाचण्यात येतो; पण त्याकडे साेयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे.
स्नानही करता आले नाही
काशी यात्रेसाठी निघालो. तीन दिवस रेल्वे प्रवास होता. त्यामध्ये पाण्याअभावी स्नानही करता आले नाही. त्यानंतर त्या ठिकाणी पोहोचले तेथेही समस्यांचा सामना करावा लागला. पुन्हा इथे पोहोचल्यानंतर प्रकृती खराब. एकूणच या सर्व गोष्टींचा आयोजकांनी किमान विचार करावा, असे एका भाविकाने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.
एकावेळी तीन हजार लोकांचा जथा
ट्रॅव्हल्स कंपनीकडून जाणाऱ्या धार्मिक सहलीमध्ये साधारण ३० ते ४० लोकांचा समूह असतो. मात्र, सध्या आयोजन करण्यात येणाऱ्या सहलीमध्ये तब्बल तीन हजार लोकांचा सहभाग असतो. त्यामुळे अपवाद वगळता अनेक यात्रांमधील भाविकांना समस्येला सामोरे जावे लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात सहल घेऊन जाण्यासाठी ७० ते ८० लाखांचा खर्च येत आहे. आतापर्यंत इच्छुकांच्या प्रत्येकी चार-पाच ट्रीप झाल्या आहेत. त्यातच निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने अनेकांनी आखडता हात घेतला आहे. त्यामुळेच या समस्या निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, लोकांच्या जिवाशी खेळत इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याने यावर कोणाचा तरी अंकुश हवा आहे, किमान यांच्यासाठी प्रशासनाने काही तरी नियमावली तयार करण्याची मागणी आता लोकांमधून होऊ लागली आहे.