भोर नगरपरिषदेची नवीन प्रभाग रचना जाहीर; ८ ऐवजी १० प्रभाग, तर १७ ऐवजी २० नगरसेवक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:58 IST2025-08-19T13:58:09+5:302025-08-19T13:58:51+5:30
- पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी १३ ऑगस्ट २०२५ रोजी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या रचनेचा तपशील नगरपरिषदेच्या कार्यालयातील नोटीस बोर्डावर आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भोर नगरपरिषदेची नवीन प्रभाग रचना जाहीर; ८ ऐवजी १० प्रभाग, तर १७ ऐवजी २० नगरसेवक
भोर :भोर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. भौगोलिक आणि लोकसंख्येच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या या प्रारूप प्रभाग रचनेत ८ ऐवजी १० प्रभाग असणार आहेत, तर नगरसेवकांची संख्या १७ वरून २० इतकी वाढली आहे. यामुळे २ प्रभाग आणि ३ नगरसेवक वाढले आहेत.
या प्रारूप रचनेवर नागरिकांना ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे.राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार, भोर नगरपरिषदेने प्रारूप प्रभाग रचना तयार केली असून, ती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नगरविकास मंत्रालयाकडे सादर करण्यात आली आहे. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी १३ ऑगस्ट २०२५ रोजी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या रचनेचा तपशील नगरपरिषदेच्या कार्यालयातील नोटीस बोर्डावर आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रभाग रचनेची वैशिष्ट्ये
प्रभाग संख्या : ८ वरून १० प्रभाग.
नगरसेवक संख्या : १७ वरून २० नगरसेवक.
लोकसंख्या : प्रत्येक प्रभागात १,७०० ते २,०००.
नगरसेवक निवड : प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडले जाणार
प्रभागनिहाय तपशील
प्रभाग क्रमांक १ : भोरेश्वर नगर, न्हावी परीट आळी, भेलकेवाडी, हनुमान मंदिर परिसर, विठ्ठल मंदिर.
प्रभाग क्रमांक २ : आमराई संकुल, काळा दत्त मंदिर, मातोश्री अहिल्यादेवी होळकर प्राथमिक. विद्यालय, नवरंग मित्र मंडळ, टोकेकर गणपती, भोरेश्वर मंदिर, तहसील कार्यालय, राजवाडा चौक, विनायक भोजनालय, रथखाना शाळा.
प्रभाग क्रमांक ३ : राजवाडा, जिजामाता शाळा, फॉरेस्ट ऑफिस, सम्राट चौक, भोर पोस्ट ऑफिस, आयडीबीआय बँक, नाना-नानी पार्क, हॉटेल राजे, खान हॉस्पिटल, दीक्षाभूमी.
प्रभाग क्रमांक ४ : स्वप्नलोकनगरी, धुमाळनगर, भोर न्यायालय, नगरपरिषद, गंगूताई वाचनालय, संगीता कोल्ड्रिंक्स, अंबिका ज्वेलर्स, सुभाष जनरल स्टोअर.
प्रभाग क्रमांक ५ : भोर बस स्टॅण्ड, तक्षशीलानगर, हॉटेल शिवकृपा, एस. टी. वर्कशॉप, भोर रुग्णालय, रामबाग, हॉटेल जयश्री, एचडीएफसी बँक, जवाहर तरुण मंडळ, पुणे जिल्हा सहकारी बँक.
प्रभाग क्रमांक ६ : भूमिअभिलेख कार्यालय, महाराणा प्रताप शाळा क्र. १, मक्का मस्जिद, कांचन झेरॉक्स, श्रीपतीनगर, खरेदी-विक्री संघ, चिकने मेडिकल.
प्रभाग क्रमांक ७ : संत गाडगेबाबा महाराज प्राथमिक विद्यालय, छत्रपती शिवाजी हायस्कूल व कॉलेज, बुरांडे हॉस्पिटल, सोनाली गार्डन, पंचायत समिती रेस्ट हाऊस, नागोबा आळी, भोई आळी, जामा मस्जिद.
प्रभाग क्रमांक ८ : महाड नाका, वनवासी आश्रम, भेलकेवाडी, भोई आळी, श्रेयारंभ बिल्डिंग.
प्रभाग क्रमांक ९ : शिक्षक कॉलनी, पेशवाई हॉटेल, स्वामी समर्थ मंदिर, अनंतराव थोपटे कॉलेज, नप जलशुद्धीकरण केंद्र, अभिजित मंगल कार्यालय, सह्याद्री मंगल कार्यालय, शिव मल्हार खंडोबा मंदिर, जवाहर कुस्ती संकुल.
प्रभाग क्रमांक १० : धनगर वस्ती भोरदरा, वाघजाई माता मंदिर, विद्या प्रतिष्ठान कॅम्पस, वाघजाई नगर, आयटीआय कॉलेज, विद्यानगर, भावे भारत गॅस, छत्रपती शिवाजी महाराज चौक चौपाटी, रोबोकॉब कॉम्प्युटर्स.
नागरिकांना आवाहन
नवीन प्रभाग रचनेमुळे काहींना फायदा, तर काहींना तोटा झाला आहे. त्यामुळे इच्छुकांचे लक्ष आता नगराध्यक्षपद आणि नगरसेवक आरक्षणाकडे लागले आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी नागरिकांना सक्रिय सहभाग नोंदवून योग्य त्या हरकती आणि सूचना सादर करण्याचे आवाहन केले आहे.