श्रेयवादावरून आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली;भोर मतदारसंघातील विकासकामांच्या निधीवरून वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 10:41 IST2025-09-09T10:41:05+5:302025-09-09T10:41:24+5:30
- आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यास राष्ट्रवादी तयार : शंकर मांडेकर

श्रेयवादावरून आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली;भोर मतदारसंघातील विकासकामांच्या निधीवरून वाद
भोर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रणधुमाळीस आतापासून सुरुवात झाल्याचे चित्र सध्या तालुक्यात पहायला मिळत आहे. तालुक्यात होणाऱ्या विकासकामांतरून आता आजी-माजी आमदारांमध्ये जुंपल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षभरामध्ये सरकारकडून कोट्यवधींचा निधी भोर तालुक्याला मिळाला आहे.
त्यावरूनच आजी-माजी आमदार समोरासमोर आले आहेत. एसटी बसच्या लोकार्पण सोहळ्यात आमदार शंकर मांडेकर यांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांकडून विकासकामांचे श्रेय घेतले जात असल्याचा आरोप भाजप नेते संग्राम थोपटे यांचे नात न घेता केला तर आम्ही मंजूर केलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन तुम्ही करता आणि आमच्यावर खोटेनाटे आरोप करता. तुमची अवस्था चोराच्या उलट्या बोंबा अशी झाली आहे. यापुढे जशाच तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा संग्राम थोपटे यांनी दिला आहे.
माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भौर विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण वातावरण ढवळून निघाले. राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांनी केलेल्या टीकेनंतर संग्राम थोपटे यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भोर एसटी आगारामध्ये झालेल्या नवीन पाच एसटी बसचा लोकार्पण सोहळा आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते झाला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी उपसभापती विक्रम खुटवड, माजी जि. प. सदस्य चंद्रकांत बाठे, यशवंत डाळ, नितीन थोपटे, विलास वरे, सुनील भेलके, प्रवीण जगदाळे, आवनीश गायकवाड, विशाल कोडे, संदीप शेटे, सोमनाथ ढतले, बाळू खुटवड, मनोज खोपडे उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार मांडेकर म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी राष्ट्रवादीने केली असून, भोर विधानसभा मतदारसंघातील तीनही पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल, मात्र, युतीबाबत पक्ष ठरवेल तो निर्णय आम्हाला मान्य असेल. भोर आगारात पहिल्या पाच आणि आता पाच अशा दहा गाड्या पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मंजूर केल्या आहेत. महायुतीत स्थानिक आमदारांना श्रेय दिले जाते. मात्र, काही जण महायुतीत मागून आले असून, आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत. त्यांच्या काळात केलेल्या कामाचे श्रेय घ्यावे. शहरातील भूमिगत गटारे, वीज वाहिनी, नगरपालिका शाळा दुरुस्ती यासह पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी लवकरच निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे, असेही आमदार मांडेकर म्हणाले.
निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करणार का?
भोर आणि राजगड तालुक्यातील भाटघर, नीरादेवघर आणि गुंजवणी धरणांमधील अतिरिक्त पाण्यासाठी आणि बंद कालव्यांच्या उपसा सिंचन प्रकल्पांसाठी निधी मिळावा, यासाठी भांडेकर जाब विचारणार का, असा सवाल करत बोलताना पातळी राखा, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असे संग्राम थोपटे यांनी सांगितले.