महापालिका निवडणूक प्रारूप मतदार याद्यांत घोळ; हरकतींना देखील अल्प वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:39 IST2025-11-26T12:38:02+5:302025-11-26T12:39:50+5:30
- नागरिक संतप्त :बहुतांश प्रभागात विरोधी उमेदवारांकडून आरोप

महापालिका निवडणूक प्रारूप मतदार याद्यांत घोळ; हरकतींना देखील अल्प वेळ
कात्रज : राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थेचे बिगुल वाजले असताना प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर लवकरच येऊ घातलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली. परंतु या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याची तक्रार नागरिकांमधून करण्यात येत आहे.
२० तारखेला प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्या असून त्यावर हरकत घेण्याची अंतिम तारीख २७ आहे सर्वसामान्य नागरिकांना मतदारांना याबाबत पूर्णपणे माहिती नसल्यामुळे मतदारांना याबाबत कशी माहिती मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मतदारांचा वॉर्ड कुठला, वॉर्डात असणारे नाव कुठं शोधायचे, जर नाव दुसऱ्या वॉर्ड मध्ये गेले असेल तर काय? ज्या ठिकाणी रहिवास आहे त्या वॉर्डमध्ये नाव हवं... ते आहे का नाही हे समजण्याचा साधा-सोपा पर्याय असायला हवा.... हरकत घ्यायची असेल तर त्यासाठी देखील साधी सोपी पद्धत असायला हवी असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
मनपाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रभाग क्रमांक ३८ मधील प्रारूप मतदार यादीमध्ये जवळपास पंधरा हजारच्या पुढे पाने असून यामध्ये नागरिकांनी नाव कसे शोधायचे असा प्रश्न देखील विचारण्यात येत आहे. तर प्रभाग क्रमांक ३७ मध्ये जवळपास सात हजार, प्रभाग क्रमांक ३९ मध्ये जवळपास पाच हजार पाने, प्रभाग क्रमांक ४० मध्ये जवळपास दहा हजार पाने आहेत. यामध्ये नागरिकांनी नावे कशी शोधायची असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
नावे शोधताना होत आहे दमछाक
प्रत्येक प्रभागामध्ये मतदारांचे नावांती यादी प्रसिध्द करताना जवळपास ३५ ते पन्नास पाने दिली गेली आहेत, त्यातून एखद्याचे नाव शोधून काढताना नागरिकांचे तब्बल तास-दोन तास जातात.
प्रभाग क्र ३८ बालाजीनगर -आंबेगाव - कात्रज
पुणे महानगरपालिकेतील सर्वांत मोठा प्रभाग असून मतदार संख्या- १,४८,७६९, प्रारूप मतदारयादी एकूण पृष्ठ १५,८६६ एवढी मोठी यादी आहे. त्यात हरकती, सूचना कालावधी फक्त ७ दिवसांचा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून प्रभागातील सीमारेषा न जुळवता प्रभाग क्र. ३७ मधील सीमारेषेवरील ६१४३/- मतदार हे मतदान प्रभाग ३८ मध्ये टाकण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकत घेण्यासाठी खूप अडचण निर्माण झाल्याने संबंधित अधिकान्याशी चर्चा केली असता मतदारांनी स्वतः हरकत घ्यावी लागेल आणि सोबत ओळखपत्र जोडावे असे कळविण्यात आले. अशा पद्धतीने हरकत घेण्यासाठी साधारण अजून काही दिवसांचा कालावधी वाढवून मिळावा किंवा आम्ही घेतलेल्या हरकतींवर घरोघरी जाऊन तपास करावा असे स्वराज बाबर यांनी सांगितले.
प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असून नागरिक यामुळे संभ्रमात आहेत. सर्व ऑनलाइन असताना मतदान यादी का ऑनलाइन होऊ नये असे प्रश्न बरेच आहेत. मतदार यादीला आधारशी लिंक का केले जात नाही याचे उत्तर कोण देणार ? - श्रीराम कुलकर्णी