पुणे महापालिकेच्या सात अधिकाऱ्यांची होणार खातेनिहाय चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 14:17 IST2026-03-27T14:16:00+5:302026-03-27T14:17:04+5:30
- महापालिकेच्या भांडार विभागात कोट्यवधींचे साहित्य धूळ खात ठेवणे पडले महागात

पुणे महापालिकेच्या सात अधिकाऱ्यांची होणार खातेनिहाय चौकशी
पुणे : महापालिकेच्या भांडार विभागाने घनकचरा विभागासाठी दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेली २० हजार किलो सिटी वेस्ट ट्रीटमेंट पावडर, ४ हजार लिटर लिक्विड बायोकॅटॅलिस्ट इकोचिप विनावापर पडून ठेवली. तसेच नऊ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या कापड आणि साड्यांचा वापर करण्यात आला नाही. या गैरकारभारास कारणीभूत ठरलेल्या भांडार आणि घनकचरा विभागातील सात अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी होणार आहे.
घनकचरा विभागाच्या मागणीनुसार भांडार विभागाने ५० लाख रुपये खर्च करून ऑगस्ट २०२३ मध्ये २० हजार किलो सिटी वेस्ट ट्रीटमेंट पावडर, ४ हजार लिटर लिक्विड बायोकॅटॅलिस्ट इकोचिपची खरेदी केली होती. याचा वापर न झाल्याने या पावडरचा व लिक्विडमधील रासायनिक घटक कमी झाल्याने त्याचा उपयोग शून्य झाला. तसेच भांडार विभागाने २०१५ मध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी ७५ लाख रुपयांचे गणवेशाचे कापड, ६९.७१ लाखांच्या साड्या खरेदी केल्या. त्याचे पैसे ठेकेदाराला दिले; पण गेल्या नऊ वर्षांत एकाही कर्मचाऱ्याला गणवेशाचे कापड, साड्या दिल्या गेल्या नाहीत. हे सर्व साहित्य वडगाव बुद्रुक येथील सावित्रीबाई फुले अभ्यासिकेत पडून होते.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभुस यांनी हा प्रकार नोव्हेंबर २०२५ मध्ये उजेडात आणला होता. भांडार विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग व लेखा व वित्त विभाग यांनी केवळ ठेकेदारांची बिले काढण्यात धन्यता मानल्याने महापालिकेचे २ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप संभुस यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि त्यांच्याकडून हा खर्च वसूल करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली होती. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची चौकशी समिती नियुक्त केली होती.
या समितीने अहवाल सादर केल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने भांडार आणि घनकचरा विभागात काम केलेल्या २० अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत आठ दिवसात खुलासा करण्याच्या सूचना केल्या होता. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे तत्कालीन कनिष्ठ अभियंता अशिष कोळगे, उपअभियंता नितीन शिंदे, कार्यकारी अभियंता मुकुंद बर्वे, उपायुक्त संदीप कदम, भांडार विभागातील तत्कालीन अधीक्षक चंद्रकांत वाघमारे, कार्यकारी अभियंता योगेश माळी आणि तत्कालीन उपायुक्त गणेश सोनुने या सात जणांचे खुलासे स्वीकारार्ह नाहीत. त्यामुळे या सर्व सात अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी होणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी काढले आहेत.
सततच्या पाठपुराव्यामुळे मध्यवर्ती भांडार गृहाच्या गैरकारभारामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेचे झालेले नुकसान दोषींच्या वेतनातून वसूल करावे, अशी आमची मागणी आहे. - हेमंत संभूस, प्रदेश सरचिटणीस, मनसे