Pune Municipal Election Results 2026: गुंड गजा मारणेला मोठा धक्का! पत्नी जयश्री मारणे पिछाडीवर; कोथरूड-बावधनमध्ये चुरस वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:26 IST2026-01-16T11:25:45+5:302026-01-16T11:26:50+5:30
कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे या मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर पडल्या आहेत.

Pune Municipal Election Results 2026: गुंड गजा मारणेला मोठा धक्का! पत्नी जयश्री मारणे पिछाडीवर; कोथरूड-बावधनमध्ये चुरस वाढली
पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत आज सर्वांचे लक्ष लागलेल्या प्रभाग क्रमांक १० (बावधन-कोथरूड डेपो) मधून मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून रिंगणात उतरलेल्या कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे या मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर पडल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून झाला होता वाद जयश्री मारणे यांना अजित पवार गटाने अधिकृत उमेदवारी (AB Form) दिल्यानंतर पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाला उमेदवारी दिल्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर कडक टीका केली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते.
मतदारांचा कौल कोणाकडे? सुरुवातीच्या कलांनुसार, या प्रभागात भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जयश्री मारणे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. गजा मारणेने प्रचारादरम्यान मतदारांवर दबाव आणल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या, मात्र सध्याचे चित्र पाहता मतदारांनी वेगळा कौल दिल्याचे प्राथमिकरीत्या दिसत आहे. मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांमध्ये ही पिछाडी जयश्री मारणे भरून काढतात की नाही, याकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे.