समाविष्ट गावांच्या विकासाला गती; पाणी, रस्ते, आरोग्य, उद्यानांवर भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:02 IST2026-03-25T13:01:31+5:302026-03-25T13:02:00+5:30
- या आराखड्यात रस्ते, पाणीपुरवठा, उद्याने, रुग्णालये आणि शाळांसाठी आवश्यक आरक्षणे निश्चित करून त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल.

समाविष्ट गावांच्या विकासाला गती; पाणी, रस्ते, आरोग्य, उद्यानांवर भर
पुणे : महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा आणि हरितक्षेत्र विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. नियोजनबद्ध विकास आराखड्याद्वारे समाविष्ट गावांना शहराच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी बजेटमध्ये समाविष्ट गावांच्या विकासाला निधी उपलब्ध करून दिला आहे. समाविष्ट २३ गावांसाठी विकास आराखड्याचा इरादा जाहीर करून एका वर्षाच्या आत प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या आराखड्यात रस्ते, पाणीपुरवठा, उद्याने, रुग्णालये आणि शाळांसाठी आवश्यक आरक्षणे निश्चित करून त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल.
नव्याने समाविष्ट ३४ गावांमध्ये समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात बावधन बुद्रुक, सूस, म्हाळुंगे, लोहगाव आणि वाघोली या भागांमध्ये २८ साठवण टाक्यांची उभारणी करण्यात येणार आहे.
मलनिस्सारण व्यवस्थेसाठी अमृत-२ योजनेअंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, या वर्षात अत्यावश्यक मलवाहिन्यांचे जाळे उभारण्याचे नियोजन आहे. तसेच ११ गावांमध्ये ५० किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्या टाकण्यात येणार असून, सांडपाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक केंद्रांची उभारणी केली जाईल. सांडपाणी थेट नाले व नद्यांमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी एमबीबीआर तंत्रज्ञानावर आधारित विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया प्रणाली उभारण्यात येणार आहे. आंबिल ओढा, माणिक नाला आणि नागझरी नाल्यावर प्रायोगिक तत्त्वावर प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येतील.
आयुष्मान आरोग्य केंद्रांची संख्या वाढविणार
नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयुष्मान आरोग्य मंदिरांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सध्या २७ केंद्रे कार्यान्वित असून, पुढील वर्षात त्यात वाढ होणार आहे. समाविष्ट गावांमध्ये रस्ते आणि पदपथांचा विकास करण्यासाठी ३२ गावांमध्ये प्रत्येकी एक रस्ता तयार करण्यात येणार असून, त्यासोबत जागतिक दर्जाचे पदपथ उभारले जाणार आहेत. तसेच उद्यानांसाठी आरक्षित जागा ताब्यात घेऊन विविध थीम पार्क विकसित करण्यात येणार आहेत. यामुळे हरितक्षेत्र वाढण्यासोबतच नागरिकांना विरंगुळा, व्यायाम आणि सार्वजनिक जागांचा लाभ मिळणार आहे.
