PMC Election Result 2026: पवारांच्या एकीचा प्रयोग फसला; सांस्कृतिक राजधानी भाजपचीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 10:06 IST2026-01-17T10:06:09+5:302026-01-17T10:06:16+5:30
काका-पुतण्या एकत्र आले, मात्र कार्यकर्ते एकत्र आलेच नाहीत

PMC Election Result 2026: पवारांच्या एकीचा प्रयोग फसला; सांस्कृतिक राजधानी भाजपचीच
पुणे : सुरुवातीला अत्यंत एकांगी वाटणाऱ्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रंग भरले. आरोप-प्रत्यारोपांची राळ उठवली. पुण्यातील चौरंगी लढतीला बहुतांश प्रभागांमध्ये दुरंगी स्वरूप देण्यात त्यांना यश आले. मात्र काका- पुतण्याच्या एकीचा 'प्रयोग' पुण्यात चाललाच नाही आणि त्याचा थेट फटका दोन्ही राष्ट्रवादी गटांना बसला. त्यामुळेच राष्ट्रवादीतील अनेक दिग्गजांना पराभवाची गळाभेट घ्यावी लागली. गोंधळाला पुणेकरांनी स्वीकारले नाही.
पुण्यात तब्बल नऊ वर्षांनी महापालिका निवडणुका पार पडल्या. २०१७ ला राष्ट्रवादीला रोखत भाजपने पुण्यावर एकहाती सत्ता आणली होती. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत वेळोवेळी भाजपने आपली पकड सिद्ध केली. याही निवडणुकीत पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत भाजपने जोरदार यश मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, वारंवार बदलणाऱ्या भूमिका आणि सत्तेसाठी घेतलेले निर्णय अजित पवारांना नडले. पुणे हे विचारांना महत्त्व देणारे शहर आहे. इथे मतदारांकडून केवळ सत्तेची गणिते नव्हे, तर राजकीय भूमिकाही तपासल्या जातात. सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे बहीण-भाऊ घरात निर्णय घेऊन बाहेर एकत्र आले. त्यामुळे काका-पुतण्याची एकी ही केवळ राजकीय गणितापुरती मर्यादित राहिली. कार्यकर्त्यांपासून मतदारांपर्यंत कोणीही दोघांना एकत्र स्वीकारले नाही.
काका-पुतण्या एकत्र आले, मात्र कार्यकर्ते एकत्र आलेच नाहीत. त्यामुळेच राष्ट्रवादीतील दिग्गजांना पराभवाची गळाभेट घ्यावी लागली.
मतविभाजनाचा फटका राष्ट्रवादीला
पक्षाचे पारंपरिक मतदार एकगठ्ठा राहिले नाहीत. परिणामी मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झाले आणि त्याचा थेट फटका राष्ट्रवादीला बसला. त्यातच काँग्रेस स्वतंत्र लढल्यामुळे अनेक मतदारसंघांत राष्ट्रवादीची मते विभागली गेली. या मतविभाजनाचा सर्वाधिक लाभ भाजपला झाला आणि त्यांचा विजय सुकर झाला. भाजपच्या प्रचारात स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर भर होता. पायाभूत सुविधा, मेट्रो, आयटी, शिक्षण, शहरी विकास. हे मुद्दे पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेले असल्याने ते प्रभावी ठरले. अजित पवारांची वेळेवर शरद पवारांसोबत जाण्याची भूमिका नागरिकांना रुचली नाही.
भाजप १२०
शिंदेसेना 00
काँग्रेस १५
राष्ट्रवादी अजित पवार २६
राष्ट्रवादी शरद पवार ३
उद्धवसेना १
मनसे 0
वंचित 0
एमआयएम 0
इतर ०