Pune: होऊ दे खर्च! एक गुंठा जमीन ,थायलंड टूर अन् हेलिकॉप्टर राईड, इच्छुकांची मतदारांना प्रलोभनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 16:31 IST2025-12-25T16:29:39+5:302025-12-25T16:31:36+5:30
वाढत्या स्पर्धेमुळे आणि उमेदवारी मिळवण्यासाठी स्वतःची ताकद दाखवण्यासाठी इच्छुक कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत.

Pune: होऊ दे खर्च! एक गुंठा जमीन ,थायलंड टूर अन् हेलिकॉप्टर राईड, इच्छुकांची मतदारांना प्रलोभनं
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्वच पक्षाच्या उमेदवारी यादी येत्या एक ते दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत इच्छूक उमेदवार मतदारांना विकासाची नाही तर अनेक महागड्या गोष्टींची प्रलोभनं दाखवत आहेत. त्यात काही उमेदवारांनी चारचाकी गाडी, थायलंडची पाच दिवसांची टूर एक गुंठा जमीन अशा ऑफर्स दिल्या जात आहेत. वाढत्या स्पर्धेमुळे आणि उमेदवारी मिळवण्यासाठी स्वतःची ताकद दाखवण्यासाठी इच्छुक कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान अवघ्या २१ दिवसावर येउन ठेपले आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. येत्या ३० डिसेंबर पर्यत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या उमेदवारी यादी येत्या एक ते दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्यांना उमेदवारीची खात्री आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीदेवीसह विविध ठिकाणी देवदर्शन सहली, हेलिकॉप्टरमधून राईड आयोजित केली आहे. व्होट बँक तयार करण्यासाठी इच्छुकांकडून अनेक फंडे वापरण्यात येत आहेत. कसब्यात प्रभाग क्रमांक २५ मध्ये पैठणीचा खेळ जिंकणाऱ्या महिलांना थेट बक्षीस म्हणून हेलिकॉप्टर राईड देण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक १ लोहगाव-धानोरी मध्ये एका इच्छुकाने चक्क ११ गुंठे जमिनीचे प्लॉट (प्रत्येकी १ हजार स्क्वेअर फूट) लकी ड्रॉद्वारे देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी नोंदणी प्रक्रियाही राबवली गेली. प्रभाग क्रमांक 3 विमाननगर मध्ये काही इच्छुकांनी जोडप्यांसाठी थायलंड (फुकेत-क्राबी) सहलीचे आयोजन केले आहे. ही सहल पाच दिवसांची असल्याचे सांगण्यात आले आहे. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी 'होम मिनिस्टर' सारखे कार्यक्रम आयोजित करून मोठ्या प्रमाणावर पैठणी साड्यांचे वाटप करण्यात आले आहे. क्रिकेट लीग आयोजित करून त्यात 1 लाख रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे आणि इतर मोठी पारितोषिके दिली जात आहेत. काही प्रभागांमध्ये महिलांना शिवणयंत्रे, तर मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले आहे.अनेक प्रभागांमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एसयूव्ही (एसयुव्ही) कार, दुचाकी (टू-व्हीलर) आणि महागड्या वस्तूंचे वाटप केले जात आहे.