Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 20:51 IST2026-01-15T20:49:46+5:302026-01-15T20:51:53+5:30
पुणे महापालिका निवडणुकीत बोगस मतदान करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. तुरुंगात असलेल्या एका व्यक्तीच्या नावावर मतदान झाले आहे.

Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
राज्यात २९ महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यादरम्यान काही ठिकाणी गोंधळ झाल्याचेही बघायला मिळाले. पुण्यातही काही ठिकाणी शंका निर्माण करणाऱ्या घटना घडल्या आहेत. तुरुंगात असलेल्या एका मतदाराच्या नावे दुसऱ्याच कुणीतरी मतदान केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे महापालिकेच्या प्रभाग २४ मध्ये ही घटना घडली आहे.
पुण्यातील प्रभाग क्रमांक २४ मधील सरस्वती मंदिर येथील मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोप केला गेला आहे. या मतदान केंद्रावर एका व्यक्तीच्या नावे मतदान झाले. पण, ज्या व्यक्तीच्या नावाने मतदान झाले, तो व्यक्ती येरवडा तुरुंगात आहे. त्यामुळे सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले.
येरवडा तुरुंगात असलेल्या व्यक्तीच्या नावाने कुणी मतदान केले, असा सवाल करत कार्यकर्ते आणि उमेदवारांकडून अधिकाऱ्यांना विचारणा केली गेली. प्रभाग क्रमांक २४ ड मध्ये भाजपाचे निवडणूक प्रमुख गणेश बीडकर हे उमेदवार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे गणेश नवघरे, शिंदेसेनेचे प्रवीण धंगेकर हेही निवणूक लढवत आहेत.
महिला मतदाराआधीच कुणीतरी करून गेलं मतदान
पुण्यातच आणखी एक बोगस मतदानाचा प्रकार घडला. मतदान केंद्रावर जाण्यापूर्वीच एका महिलेच्या नावाने दुसऱ्याच कुणीतरी मतदान करून गेले.
महिला मतदानाला गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यामुळे महिलेने निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पुण्यातील प्रभाग क्रमांक २१ मधील कटारिया हायस्कूल येथील मतदान केंद्रावर ही घटना घडली. महिलेने निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि गोंधळ घातला. त्यानंतर या महिला मतदाराचे पोस्टल मतदान करून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.