पुण्यातील उमेदवाराने अधिकाऱ्यांना कामाला लावले; डिपॉझिट भरताना दिली चक्क २, ५ अन् १० ची नाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:52 IST2025-12-29T16:50:17+5:302025-12-29T16:52:42+5:30
पुण्यातील अपक्ष उमेदवाराने क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना चांगलेच कामाला लावले असून डिपॉझिट चक्क नाण्यांच्या स्वरूपात अधिकाऱ्यांसमोर आणून ठेवले आहे

पुण्यातील उमेदवाराने अधिकाऱ्यांना कामाला लावले; डिपॉझिट भरताना दिली चक्क २, ५ अन् १० ची नाणी
पुणे : पुण्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे. पक्षांकडून उमेदवारांची यादीही जाहीर करण्यात येत आहे. तर काहींना थेट एबी फॉर्मही देण्यात आले आहेत. पक्षीय उमेदवारांबरोबर अपक्ष फॉर्मही भरण्यास आता सुरुवात झाली आहे. अशातच पुण्यातील एका अपक्ष उमेदवाराने क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना चांगलेच कामाला लावले आहे. फॉर्म भरण्यासाठी लागणारे ५ हजार डिपॉझिट या उमेदवाराने चक्क नाण्यांच्या स्वरूपात अधिकाऱ्यांसमोर आणून ठेवले आहे.
प्रभाग - 26(ड) घोरपडी पेठ-गुरुवार पेठ- समताभुमी मधून अपक्ष उमेदवार गणेश किरण खानापुरे यांनी चिल्लर स्वरूपात डिपॉझिट भरत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नागरिकांनी २, ५ आणि १० ची नाणी गोळा करून मला फॉर्म भरायला दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना ५ हजार रुपये डिपॉझिट भरावे लागते. त्यानंतर मतांच्या आकडेवारीवरून ते जप्त होणार कि नाही? हे ठरवले जाते. हेच डिपॉझिट भरण्यासाठी खानापुरे यांनी अनोखी शक्कल लढवत ५ हजारांची नाणी अधिकाऱ्यांना आणून दिली आहेत. अधिकाऱ्यांनीही ती स्वीकारून तातडीने मोजण्यास सुरुवात केली.
दरम्यान पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवार आणि मंगळवार हे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. शेवटच्या दोन दिवसांत अर्ज भरण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये गर्दी होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना विविध विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवारी जे इच्छुक अर्ज करतील त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल. पण, मंगळवारी अर्ज केलेल्यांना प्रमाणपत्र मिळेलच याची खात्री नाही, असे महापालिकेतर्फे स्पष्ट केले आहे.