मिरवणुकीला उशीर, गर्दीमुळे चेंगराचेंगरी, पोलिसांचा आत्मविश्वास नडला; वेळेचे नियोजन कागदावरच, पुणेकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 14:02 IST2025-09-08T14:01:47+5:302025-09-08T14:02:34+5:30
पुण्यातील मंडळे आहेत, वचन देतात, पण त्यांना जे करायचे तेच करतात, हा जुन्या जाणत्या पोलिस अधिकाऱ्यांचा सल्ला हलक्यात घेतल्याचा फटका काल पुणे पोलिसांना बसला

मिरवणुकीला उशीर, गर्दीमुळे चेंगराचेंगरी, पोलिसांचा आत्मविश्वास नडला; वेळेचे नियोजन कागदावरच, पुणेकरांची टीका
पुणे : यंदा विसर्जन मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी पुणे पोलिसांनी केलेले सूक्ष्म नियोजन कागदावरच राहिले. गणेश मंडळांसोबत वारंवार बैठका घेतल्यानंतरही काही मंडळांनी पोलिसांनी ठरवून दिलेल्या वेळा न पाळल्याने मिरवणूक लांबली असल्याचे सांगण्यात आले आहे. शहरात शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास तब्बल १ तास आधीच गणेश विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. त्यानंतर काही तासांतच पुणेकरांचा उत्साह शिगेला पोहोचला आणि ढोल-ताशा पथके आणि डीजेच्या तालावर तरुणाई थिरकायला लागली. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मुख्य पेठांतील वातावरण भारावून गेले. यावेळी झालेली प्रचंड गर्दी आणि ढोल-ताशा पथकांचा तासन्तास वादनाचा आग्रह यामुळे पोलिसांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मंडळे आपल्या शब्दाबाहेर जाणार नाहीत, हा आत्मविश्वास चांगलाच नडल्याचे रविवारी संध्याकाळपर्यंत चाललेल्या विसर्जन मिरवणुकांवरून स्पष्ट झाले आहे.
ही पुण्यातील मंडळे आहेत, वचन देतात, पण त्यांना जे करायचे तेच करतात, हा जुन्या जाणत्या पोलिस अधिकाऱ्यांचा सल्ला हलक्यात घेतल्याचा फटका काल पुणे पोलिसांना बसला. यातच काही नवख्या पोलिस अधिकाऱ्यांमुळे ठिकठिकाणी कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लागेल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मंडळाचे कार्यकर्ते आणि ढोल-ताशा पथकांची दबंगगिरी नेहमीप्रमाणेच होती. हे कार्यकर्ते अनेक ठिकाणी पोलिसांना जुमानत नसल्याचे चित्र होते. टिळक रस्त्यावर अलका चौकात काही वेळ प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी चपलांचा अक्षरश: खच पडला होता.
शनिवारी संध्याकाळी सहानंतर लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्त्यावर भाविकांची प्रचंड गर्दी होती. गर्दीत सापडलेल्यांना श्वास घेणेदेखील अवघड झाले होते. यातच रस्ते बांबूच्या बॅरिकेड्स लावून बंद केल्याने नागरिकांना गर्दीतून बाहेर पडणे किंवा रस्ता ओलांडता येत नसल्याने प्रचंड कोंडी झाली. या गर्दीचे नियोजन करताना अक्षरश: पोलिसांच्या नाकीनऊ आले. त्यातच काही मंडळांनी गोंधळ घातल्याने विसर्जन मिरवणुकीचा वेळ आणखीच वाढला. पोलिसांनी वारंवार सूचना करूनही काही मंडळांनी त्यांना जुमानले नाही. यात सुदैवाने एक महिला अधिकारी रथाच्या ट्रॅक्टरखाली जाताजाता थोडक्यात बचावल्या. एका माजी आमदारानेदेखील पोलिसांसोबत वादावादी केल्याची घटना घडली.
संदीपसिंह गिल यांची आठवण...
गेल्या वर्षी वा त्याच्या मागील वर्षी परिमंडळ १ चे तत्कालीन पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांची अत्यंत चोख आणि सगळ्या गणेश मंडळांना विश्वासात घेऊन गणेश विसर्जन मिरवणुकीचे नियोजन केले होते. गणेश मंडळांमध्येही त्यांची चांगलीच क्रेझ होती. विद्यमान उपायुक्त कृषिकेश रावले यांनी केलेले नियोजन, गणेश मंडळांशी साधलेला संवाद आणि प्रत्यक्षात परिस्थिती यात बरीच तफावत पाहायला मिळाली. त्यामुळे कुठे तरी रावले यांच्या हाताबाहेर नियोजन गेल्याचे चित्र रविवारी उशिरापर्यंत चाललेल्या विसर्जन मिरवणुकीवरून दिसून आले.