Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 16:08 IST2025-12-23T16:04:14+5:302025-12-23T16:08:41+5:30
Prashant Jagtap News: पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. या निर्णयाला पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केला आहे.

Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
"दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याबद्दलचा निर्णय अजून कळलेला नाही. कालच मी मुंबईला सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासोबत भेट झाली. त्यामध्ये सविस्तर अहवाल ठेवला आहे. आता सुद्धा सकाळी माझे आणि सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे यांच्यासोबत बोलणं जालं. मला मुंबईला अर्जंट बोलवलं आहे", असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजित पवारांसोबत आघाडी करण्याला विरोध असण्याचे कारणावर खुलासा केला आहे. प्रशांत जगताप आज मुंबई पक्षाच्या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर निर्णय जाहीर करणार आहेत.
माध्यमांशी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, "मला पक्षाची कोंडी करायची नाहीये, कारण मी शरद पवारांवर प्रेम आणि श्रद्धा असणारा कार्यकर्ता आहे. कदाचित काही ठरलं असेल, तर माझा जो निर्णय आहे. तो सांगायला मी निघालो आहे. यात कुठल्याही प्रकारे इमोशनल ब्लॅकमेली, इमोशनल ड्रामा नाहीये. यासंदर्भात पक्ष म्हणून काही मर्यादा असतात. तडजोडी असू शकतात. त्याबद्दल मला कल्पना नाहीये. पण, २७ वर्षांपासून पक्षाचे काम करतोय. कधी टीका केली नाही. पक्ष सोडला नाही. वरिष्ठ पातळीवर काय ठरलं, हे मला कळेल आणि त्यानंतर जो काही निर्णय असेल, तो संध्याकाळपर्यंत जाहीर करणार आहे", असे प्रशांत जगताप यांनी सांगितले.
प्रशांत जगताप म्हणाले, त्या भूमिकेशी तडजोड नको
"उद्या मी इथे नसलो तरी शरद पवारांबद्दल श्रद्धा कायम असेल. आजची जी अस्वस्थता आहे, ती काय तर २ जुलै २०२३ रोजी अजित पवार तिकडे. त्यावेळी अजित पवार की शरद पवार साहेब, असे होते. त्यावेळी आम्ही शरद पवारांसोबत राहिलो. विचारधारा सोडायची म्हणून थांबलो होतो. पण, आम्ही इथे भाजपविरोधात लढत आहोत. ज्या कार्यकर्त्यांनी काम केले, त्यांना संधी दिली गेली पाहिजे. पुणेकर राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्याकडे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून बघतात. त्या भूमिकेशी तडजोड नको, हीच माझी भूमिका आहे. ती कालही मांडली, आजही मांडली. पक्षाचा निर्णय झाल्यानंतर माझी भूमिका मांडेल", असे जगताप यांनी म्हटले आहे.
म्हणून अजित पवारांसोबत आघाडी करण्याला विरोध
"अजित पवारांचा पक्ष आणि आम्ही लोकसभा, विधानसभेला विरोधात लढलो. पुणेकरांनी महायुतीच्या विरोधात जाऊन आम्हाला मतदान केलं. अजित पवारांचा पक्ष आज सत्तेत आहे. असे असताना पुणेकरांसमोर आम्ही संभ्रम का उभा करायचा आहे", असा प्रश्न जगताप यांनी उपस्थित केला.
"भाजपवर आम्ही टीका करायची आणि भाजपाच्याच एका मित्रपक्षाबरोबर २०-२५ दिवसांसाठी आघाडी करायची. याचे दूरगामी परिणाम होत असतात. मला त्या निर्णयावर काहीही भाष्य करायचं नाही. उद्याचा निर्णय मी संध्याकाळी जाहीर करेन. पुणेकरांसमोर काय विचार घेऊन जायचा, याचे धोरण प्रत्येक पक्षाला ठरवावं लागेल", असे प्रशांत जगताप यांनी सुनावले.