अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 18:30 IST2026-01-13T18:27:32+5:302026-01-13T18:30:17+5:30
अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
पुणे - महापालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. त्यातच पुण्यात मोठी घडामोड घडली आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार असलेले नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीच्या कार्यालयावर पोलिसांनी कारवाई केली आहे. क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी डिझाईन बॉक्सच्या कार्यालयात कागदपत्रांची तपासणी केली. मात्र अचानक ही कारवाई का करण्यात आली याबाबत कारण पुढे आले नाही.
पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपा आणि अजित पवारांची जुगलबंदी पाहायला मिळाली. त्यातच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी क्राइम ब्रांचकडून नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली. अरोरा यांची डिझाईन बॉक्स कंपनी ही लोकसभा निवडणुकीपासून अजित पवारांचे काम करते. अजित पवारांच्या प्रचारसभांपासून सर्व रणनीती आखण्यात या कंपनीची पडद्यामागून भूमिका असते. या डिझाइन बॉक्सच्या माध्यमातून अजित पवारांची प्रतिमा जनमानसात बदलण्याचा प्रयत्न गेल्या काही काळापासून सुरू आहे. या डिझाइन बॉक्सच्या कार्यालयात पुणे क्राइम ब्रांचच्या पथकाने जाऊन काही कागदपत्रांची पडताळणी केली आहे. मात्र निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ही कारवाई होणं यामागे बरेच अर्थ काढले जात आहेत.
अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हे भ्रष्टाचाराचे आरोप करताना अजित पवारांनी मुरलीधर मोहोळ, महेश लांडगे यासारख्या नेत्यांवर वैयक्तिक टीकाही केली आहे. अजित पवारांनी पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला कोंडीत पकडण्याचं काम केले. मात्र पक्षाच्या त्या मागच्या धोरणात्मक रणनीतीत महत्त्वाची भूमिका डिझाइन बॉक्सची होती. त्यामुळे या कंपनीच्या कार्यालयावर जाऊन जर पोलीस कारवाई करत असतील नक्कीच अजित पवारांनी निवडणुकीत जो प्रचार केलेला आहे त्या प्रचाराला या कारवाईशी जोडलं जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना क्राइम ब्रांचने अशाप्रकारे का कारवाई केली हे कळत नाही. सांगोल्यातही शहाजी पाटील यांच्या ठिकाणी अशीच कारवाई निवडणुकीपूर्वी केली मात्र तिथे जनतेने उत्तर दिले. त्यामुळे या कारवाईमागे कुणाचे कारस्थान आहे का, यामागचा मास्टरमाइंड कोण हे आम्ही १६ तारखेनंतर सांगू. पोलिसांनी त्यांची कारवाई केली त्यात हरकत नाही. कर नाही त्याला डर कशाला...ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांनी असं कुभांड केलंय का त्याचे उत्तर १७ तारखेला देऊ. ही कारवाई वरून साधी सोपी वाटत असली तरी त्यामागे राजकीय किनार असल्याची शक्यता नाकारता येत नाही असं राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं.