PMC Elections2026 : “संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे थोबाड फोडू” – रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 12:22 IST2026-01-11T12:20:44+5:302026-01-11T12:22:24+5:30
संविधान कुणालाही बदलता येणार नाही. जो कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न करेल, त्याचे थोबाड फोटले जाईल

PMC Elections2026 : “संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे थोबाड फोडू” – रामदास आठवले
पुणे : ‘मी कुठे गेलो तरी माझ्या हातात असतो निळा झेंडा, म्हणून त्यांच्या पोटात उठतो गोळा !’ असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हणाले, राजकारणात परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे मी भाजप सोबत आहे. सामान्य जनतेच्या विकासाच्या मुद्द्यावरून मी सत्तेसोबत आहे. मात्र, संविधान कुणालाही बदलता येणार नाही. जो कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न करेल, त्याचे थोबाड फोटले जाईल, अशा कठोर शब्दांत त्यांनी ठाम भूमिका व्यक्त केली. येरवडा नागपूर चाळ येथे मनपा निवडणुकीत भाजप व आरपीआय युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ रामदास आठवले बोलत होते.
यावेळी प्रभागातील उमेदवार ॲड. रेणुका चलवादी, सुधीर वाघमोडे, आदित्य बाबर, राहुल जाधव यांच्यासह आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, नानासाहेब नलावडे, सुभाष चव्हाण, हुलगेश चलवादी, मंगेश गोळे, आकाश कांबळे, विनोद काळे, महेश पाटील इ. उपस्थित होते.
यावेळी आठवले म्हणाले, “महापालिकेत सध्या आमच्या पक्षाला नऊ जागा मिळाल्या असून, मागील निवडणुकीत ११ जागा मिळाल्या होत्या. यावेळी आणखी तीन-चार जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, निवडणूक उशिराने होत असल्याने इच्छुकांची संख्या वाढली. काहींनी पक्ष सोडला, पण राजकारणात एक गेला की दुसरा येतच असतो.” त्यामुळे जे येथील त्याच्या सोबत जे नाहीत त्याशिवाय निवडणूक लढवली जाते.
पुणे मनपा निवडणुकीत अजित पवार यांना सोबत घेतले असते, तर राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली असती. त्यामुळे ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी भाजप-युतीसोबत ठामपणे आहे. राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रेम आहे. पण या निवडणुकीत नाही. जोपर्यंत मनपा निवडणूक तो पर्यंत जमणार नाही आणि निवडणूक झाल्यानंतर अजितदादाशिवाय जमत नाही, असा मिश्कील टोलाही लगावला.