PMC Elections2026 : प्रभाग क्रमांक ३ मध्ये महिलांवर फोकस; ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 12:43 IST2026-01-11T12:43:06+5:302026-01-11T12:43:43+5:30
प्रभाग क्रमांक ३ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी महिलांसाठी खास जाहीरनामा सादर करून प्रचारात वेगळेपण जपले आहे.

PMC Elections2026 : प्रभाग क्रमांक ३ मध्ये महिलांवर फोकस; ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा
पुणे - महानगरपालिकेच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून, प्रत्येक प्रभागात प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी महिलांसाठी खास जाहीरनामा सादर करून प्रचारात वेगळेपण जपले आहे.
महिला आरोग्य, महिला सुरक्षितता, महिला कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरण या चार प्रमुख स्तंभांवर आधारित हा जाहीरनामा असून, विशेषतः लोहगाव आणि वाघोली परिसरातील महिलांच्या गरजा लक्षात घेऊन त्याची आखणी करण्यात आली आहे. निवडून आल्यानंतर या चारही विषयांवर प्राधान्यक्रमाने काम केले जाईल, असा ठाम विश्वास ऐश्वर्या पठारे यांनी व्यक्त केला आहे.
घरोघरी जाऊन जाहीरनाम्याची अंमलबजावणी
फक्त जाहीरनामा प्रसिद्ध करून थांबायचे नाही, तर वाघोली आणि लोहगाव परिसरातील घरोघरी जाऊन या योजनांची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या आरोग्यासाठी मूलभूत सुविधा, सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना, कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण आणि आर्थिक-सामाजिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रचारात भाजपची आघाडी
प्रभाग क्रमांक ३ मध्ये सुरुवातीपासूनच भाजपने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. उच्चशिक्षित आणि आयटी क्षेत्रातील अनुभव असलेल्या ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी आपल्या वेगळ्या शैलीमुळे प्रचारात ठसा उमटवला आहे. त्यांनी “नगरसेवक म्हणून नव्हे, तर प्रभागाची प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करणार” अशी भूमिका आधीच मांडली होती.
‘100 दिवस 100 कामे’ संकल्पनेचा प्रचारात वापर
प्रचारादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘100 दिवस 100 कामे’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा संदर्भ देत, निवडून आल्यानंतर 100 दिवसांत 100 कामे पूर्ण करण्याचा संकल्प जाहीर केला. कोणत्या कामांना प्राधान्य दिले जाईल याचाही सविस्तर लेखाजोखा त्यांनी मतदारांसमोर मांडला होता.
पूर्व पुण्यातील वेगवान विकास आणि महिलांचे सक्षमीकरण
येरवडा, वाघोली, लोहगाव, चंदननगर आणि खराडी असा पूर्व पुण्याचा भाग झपाट्याने विकसित होत आहे. या विकास प्रक्रियेत महिलांचा सक्रिय सहभाग कसा वाढवता येईल, त्यांना सक्षम कसे करता येईल, याच उद्देशाने हा महिला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
आता निर्णय मतदारांच्या हातात
विशेषतः महिलांवर केंद्रित जाहीरनाम्यामुळे प्रभाग क्रमांक ३ मधील निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे. सुशिक्षित आणि आधुनिक विचारसरणीच्या उमेदवार असलेल्या ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांच्या पाठीशी प्रभागातील मतदार उभे राहतात का, आणि त्यांना पुणे महानगरपालिके च्या सभागृहात पाठवतात का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.