PMC Elections : महापालिका निवडणूक ‘आप’साठी ओळख निर्माण करणारी की मर्यादा स्पष्ट करणारी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 14:36 IST2025-12-24T14:35:23+5:302025-12-24T14:36:37+5:30
पुण्यासारख्या सुशिक्षित, मध्यमवर्गीय व नागरी प्रश्नांबाबत जागरूक असलेल्या शहरात पक्षाला संधी असल्याचा दावा आपने केला आहे.

PMC Elections : महापालिका निवडणूक ‘आप’साठी ओळख निर्माण करणारी की मर्यादा स्पष्ट करणारी?
विश्लेषण
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात नवा पर्याय म्हणून पुढे येणाऱ्या आम आदमी पार्टीकडे (आप) राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून उदयास आलेल्या या पक्षाने गेल्या काही वर्षांत दिल्ली व पंजाबमध्ये सत्ता मिळवली असली, तरी पुणे महापालिकेत पक्षाचा प्रवास अजून प्रारंभिक टप्प्यातच असल्याचे चित्र आहे.
‘आप’ची स्थापना २०१२ मध्ये झाली, तेव्हा महाराष्ट्रात सुरुवातीला विधानसभा व लोकसभा निवडणुकांत मर्यादित सहभाग घेतला. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनतर पक्षाने महानगरपालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती आखली आहे. पुण्यासारख्या सुशिक्षित, मध्यमवर्गीय व नागरी प्रश्नांबाबत जागरूक असलेल्या शहरात पक्षाला संधी असल्याचा दावा आपने केला आहे.
सन २०१७ मध्ये पुणे महापालिका निवडणुकीत आपचा सहभाग अत्यंत मर्यादित होता. पक्षाने काही निवडक प्रभागांत उमेदवार उभे केले होते, मात्र एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. बहुतांश उमेदवारांना शेकड्यात तर काहींना हजार मतांपर्यंत मजल मारता आली. त्यावेळी महापालिकेवर भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या पारंपरिक पक्षांचेच वर्चस्व होते.
‘आप’च्या उमेदवारांना मिळालेली मते ही मुख्यतः शहरी मध्यमवर्ग, तरुण मतदार आणि ‘पर्याय शोधणाऱ्या’ मतदारांकडून मिळाल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. मात्र मजबूत स्थानिक संघटना, ओळखीचे उमेदवार आणि आर्थिक ताकद यांचा अभाव पक्षाच्या कामगिरीवर परिणाम करणारा ठरला.
सध्यस्थिती आणि आगामी निवडणूक तयारी
आगामी निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर ‘आप’ने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने आजपर्यंत ४१ उमेदवार जाहीर केले असून, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, वाहतूक, प्रदूषण आणि पारदर्शक कारभार हे प्रचाराचे मुख्य मुद्दे असणार आहेत. पुण्यात पक्षाचे संघटन गेल्या दोन-तीन वर्षांत वाढले असले, तरी इतर प्रमुख पक्षांच्या तुलनेत मर्यादित आहे. सध्या 'आप'चा महापालिकेत एकही नगरसेवक नाही; मात्र आगामी निवडणुकीत किमान काही जागांवर खाते उघडण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे.
काही प्रभागातील राजकीय समीकरणांवर परिणाम
'आप'च्या उपस्थितीमुळे काही प्रभागांत पारंपरिक पक्षांच्या मतांमध्ये विभागणी होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. विशेषतः शहरी मध्यमवर्गीय मतदारांमध्ये 'आप' हा ‘तिसरा पर्याय’ ठरतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे महापालिकेच्या राजकारणात आम आदमी पार्टीचा प्रवास अजून सुरुवातीच्या टप्प्यात असला, तरी पक्षाने आपले अस्तित्व नोंदवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रत्यक्षात किती उमेदवार विजयी होतात आणि किती मते मिळतात, यावरच 'आप'ची पुण्यातील पुढील राजकीय दिशा ठरणार आहे. आगामी महापालिका निवडणूक ही 'आप'साठी ओळख निर्माण करणारी अथवा मर्यादाच स्पष्ट करणारी ठरेल, हे निकालांनंतरच स्पष्ट होणार आहे.