PMC Elections : माजी नगरसेवकांच्या भाजपा प्रवेशाने धनकवडीतील राजकीय समीकरणे बिघडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:34 IST2025-12-25T12:33:03+5:302025-12-25T12:34:20+5:30
राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक निवडून येणारा प्रभाग काबीज करण्यासाठी भाजपकडून जाळे अनेक कार्यकर्ते गळाला लागल्याने चुरस वाढणार

PMC Elections : माजी नगरसेवकांच्या भाजपा प्रवेशाने धनकवडीतील राजकीय समीकरणे बिघडणार
पांडुरंग मरगजे
धनकवडी :भाजपाचा प्रवेश महोत्सव महाराष्ट्रात गाजत असून महापालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण पुरते ढवळून निघाले आहे. पुण्यातील तब्बल बावीस नगरसेवकांच्या जंबो प्रवेशाने तर राजकीय समीकरणे पुरती बिघडून गेली आहेत, त्याला धनकवडीही अपवाद राहिलेली नाही. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धनकवडीला भारतीय जनता पक्षाचे सुरूंग लावला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावंत शिलेदार असलेले माजी नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे यांना गळाला लावले आणि त्यांचा भाजपा प्रवेश पार झाला आहे.
धनकवडे यांनी शनिवारी सकाळी मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. दक्षिण उपनगरातील नवीन प्रभाग क्रमांक ३७ धनकवडी कात्रज डेअरीमध्ये धनकवडे यांच्या प्रवेशाची मागील दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती, त्यावर आज शिक्कामोर्तब झाल्यामुळे शेवटच्या क्षणी धनकवडीतील राजकीय वातावरण एकदम ३६० डिग्रीत बदलल्याची स्थिती आहे. या संदर्भात लोकमतने पंधरा दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी थांबण्याचे संकेत दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कमजोर झाली असून भाजपचे पारडे जड झाले आहे. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत धनकवडी जुना प्रभाग ३९ आणि आताचा ३७ मध्ये या आधीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचेच प्राबल्य राहिले आहे. चारपैकी तीन उमेदवार राष्ट्रवादीने जिंकून आपलं वर्चस्व अबाधित राखलं होतं. भाजपचा केवळ एकच उमेदवार विजयी झाला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तीन उमेदवार विजयी झाले होते.