PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 12:10 IST2025-12-27T12:09:35+5:302025-12-27T12:10:02+5:30
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या साथीनेच लढण्याचा निर्णय घेत काँग्रेस आणि उद्धवसेनेशी चर्चा सुरू केली आहे.

PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही राष्ट्रवादीचे जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्याने चर्चा फिस्कटली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या साथीनेच लढण्याचा निर्णय घेत काँग्रेस आणि उद्धवसेनेशी चर्चा सुरू केली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही पक्षांच्या आघाडीसाठी शरद पवार गटाचे नेते माजी महापौर अंकुश काकडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती होस्टेलवर शुक्रवारी रात्री भेट घेतली. त्यावेळी जागावाटप आणि घड्याळ की तुतारी चिन्हावर लढायचे, याविषयी चर्चा झाली. शरद पवार गट तुतारी चिन्हासाठी ठाम होता. केवळ ३५ जागा देण्याचा प्रस्तावही शरद पवार गटाला अमान्य होता. त्यामुळे चर्चा फिस्कटली.
महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी बैठक
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाशी चर्चा फिस्कटल्यानंतर शरद पवार गटाने तातडीने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा सुरू केली आहे. काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तिन्ही पक्षांची उशिरा रात्री संयुक्त बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे विशाल तांबे, अंकुश काकडे, मनाली भिलारे, अश्विनी कदम आणि आमदार बापू पठारे, तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे, अभय छाजेड, रमेश बागवे आणि उद्धवसेनेचे वसंत मोरे, गजानन थरकुडे, संजय मोरे हे उपस्थित होते.