PMC Elections : महाविकास आघाडीत समान जागा लढविण्याची तयारी? मनसेचा प्रश्न कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 11:52 IST2025-12-28T11:50:11+5:302025-12-28T11:52:20+5:30

- मनसे उद्धवसेनेसोबत येण्यास तयार असली आघाडीत तिला स्थान असेल का?

PMC Elections Preparation to contest equal seats in Mahavikas Aghadi? MNS's question remains | PMC Elections : महाविकास आघाडीत समान जागा लढविण्याची तयारी? मनसेचा प्रश्न कायम

PMC Elections : महाविकास आघाडीत समान जागा लढविण्याची तयारी? मनसेचा प्रश्न कायम

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप ठरल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या तीन प्रमुख पक्षांना प्रत्येकी ५० जागा, तर समविचारी मित्रपक्षांना १५ जागा देण्याबाबत एकमत झाल्याचेही बोलले जात आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, मनसे उद्धवसेनेसोबत येण्यास तयार असली आघाडीत तिला स्थान असेल का? याबाबत अनिश्चितता आहे. या १५ जागांपैकी किती जागा मनसेला मिळणार आणि त्याला मनसेची मान्यता देणार का? यावर अनेक समीकरणे अवलंबून असतील.

महापालिका निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी अजित पवार गटाला दूर ठेवल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांची संभाव्य युती होईल अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, ती फिसकटली तर सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवार गटाशी युती नको, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसने घेतली. अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी (दि. २६) झालेल्या बैठकीत जागावाटपाच्या सूत्रावर शिक्कामोर्तब झााल्याचे बोलले जात आहे. याबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, ‘महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढविण्यास तयार आहे. पुण्यातील आघाडीत मनसेचा समावेश नाही. समसमान जागावाटप करण्यात येणार असले, तरी एखाद्या प्रभागात ज्या पक्षाचा उमेदवार अधिक सक्षम असेल, त्याला प्राधान्य देण्यात येईल.’

जागावाटप

उद्धवसेना : ५०

काँग्रेस : ५०

राष्ट्रवादी (शरद पवार) : ५०

समविचारी मित्रपक्ष : १५

 प्रशांत जगताप हे वानवडीमधून महापालिकेत प्रतिनिधित्व करत होते. त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेत राष्ट्रवादी शरद पवार गटाने या प्रभागावर दावा केला आहे. त्यामुळे प्रशांत जगताप यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल का?, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रभागात भाजपकडे तगडा चेहरा नसल्यानेच काँग्रेसच्या माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर यांच्यावर गळ टाकण्यात आला. त्यामुळे भाजप या प्रभागातून शिवरकर यांच्या रूपाने राष्ट्रवादीला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. हा प्रभाग राष्ट्रवादीने आपल्याकडेच ठेवल्यास प्रशांत जगताप यांना कोणत्या प्रभागातून उमेदवारी दिली जाईल, याकडे देखील लक्ष लागून आहे. 

 

तिन्ही प्रमुख पक्षांना समान जागावाटप करण्यात आले आहे. समविचारी मित्रपक्षांनाही १५ जागा देण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडी भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या विरोधात ताकदीने निवडणूक लढवेल. — संजय मोरे, शहरप्रमुख, उद्धवसेना

समान प्रमाणात जागावाटपाचे सूत्र निश्चित झाले आहे. ज्या प्रभागात ज्या पक्षाचा प्रबळ उमेदवार असेल, त्या पक्षाला ती जागा दिली जाईल. एकजुटीने भ्रष्ट भाजपच्या विरोधात लढा देणार आहोत. - अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस

उद्धवसेनेबरोबर युतीची चर्चा सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीस आम्हाला बोलावण्यात आले होते; मात्र आघाडीत सामील होण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच शनिवारी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची बैठक पार पडली. महाविकास आघाडीबाबत पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील. - साईनाथ बाबर, शहराध्यक्ष, मनसे 

अजित पवार गटाने दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय झाला आहे.  - अंकुश काकडे, प्रवक्ते, राष्ट्रवादी शरद पवार गट

Web Title : पीएमसी चुनाव: एमवीए में समान सीट बंटवारे की तैयारी; मनसे का सवाल बरकरार

Web Summary : पुणे चुनावों के लिए एमवीए समान सीट बंटवारे पर विचार कर रही है, मनसे का समावेश अनिश्चित है। कांग्रेस ने अजित पवार गुट के साथ गठबंधन का विरोध किया। पार्टियों के बीच सीट वितरण तय, लेकिन मनसे की भूमिका अस्पष्ट।

Web Title : PMC Elections: MVA Prepares for Equal Seat Sharing; MNS Question Lingers

Web Summary : MVA considers equal seat sharing for Pune elections, leaving MNS's inclusion uncertain. Congress opposes alliance with Ajit Pawar faction. Seat distribution among parties decided, but MNS's role remains unclear.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.