PMC Elections : अखेर प्रशांत जगतापांनी पुरोगामी विचारच निवडले; दादरमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:38 IST2025-12-26T13:36:16+5:302025-12-26T13:38:23+5:30
आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत प्रशांत जगताप यांनी मुंबईत अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

PMC Elections : अखेर प्रशांत जगतापांनी पुरोगामी विचारच निवडले; दादरमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश
पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या हालचालींना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तीव्र विरोध केला होता. या नाराजीमुळे त्यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत प्रशांत जगताप यांनी मुंबईत अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, आज प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. जगताप यांच्यासारखे विचारांशी बांधील, मूल्याधिष्ठित राजकारण करणारे नेते काँग्रेसला हवे आहेत. काही जातीयवादी पक्षांनी जगताप यांना ऑफर दिली होती, मात्र त्यांनी ती नाकारून काँग्रेसची वाट निवडली.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, नगरपरिषदेत मिळालेले यश हे बदल घडवणारे ठरेल. आम्ही कोणतीही बाह्य मदत न घेता स्वबळावर नगरपरिषदांची निवडणूक लढवली. नव्याने निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना मी शुभेच्छा देतो. प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पुण्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर फेसबुक पोस्ट शेअर केली आहे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, पुरोगामी विचारांच्या वाटचालीला नवी दिशा... शिव - शाहू - फुले - आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारावर निरंतर वाटचाल करणे, या वैचारिक पायावर समतावादी समाज घडवणे हे एक कार्यकर्ता म्हणून माझ्या जीवनाचे ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी आजपासून मी "काँग्रेस" पक्षात कार्यरत होत आहे. भारताला परकीय सत्तेपासून मुक्त करण्यासाठी काँग्रेसने यशस्वी लढा दिला, आजही काँग्रेस पक्ष भारताला धार्मिक - जातीय द्वेषापासून मुक्त करण्यासाठी लढत आहे. या लढ्याचे नेतृत्व करणारे, संविधानाच्या रक्षणार्थ बलाढ्य शक्तींना आव्हान देणारे देशाचे नेते आदरणीय श्री. राहूलजी गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खरगे जी यांच्या नेतृत्त्वात मी एक कार्यकर्ता म्हणून पूर्ण ताकदीने योगदान देणार आहे. मला ही संधी देणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाचे, पुणे शहरातील सर्व नेत्यांचे व मला भक्कम पाठबळ देणाऱ्या माझ्या सर्व जीवाभावाच्या माणसांचे, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार ! असेही जगताप यांनी लिहिले आहे.
२७ वर्षांनंतर पक्षाचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे. आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे मनापासून आभार! २७ वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो. आज २७ वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल. आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार! असं म्हणतं त्यांनी राजीनामा दिला आहे.