PMC Elections : प्रचार महागात पडला..! राष्ट्रवादीच्या शिवाजी गदादे पाटलांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 20:04 IST2025-12-31T20:02:25+5:302025-12-31T20:04:02+5:30
आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही, याची काळजी घेणे, निवडणूक विषयक तक्रारींचे निराकरण करणे, हे या गटाचे काम आहे.

PMC Elections : प्रचार महागात पडला..! राष्ट्रवादीच्या शिवाजी गदादे पाटलांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा
पुणे : महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली. त्याआधीच टेम्पो व रिक्षावर बॅनर लावून प्रचार सुरू करणाऱ्या राष्ट्रवादी (अजित पवार)चे शिवाजी गदादे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक २८ जनता वसाहत, हिंगणे खुर्दमध्ये शिवाजी गदादे पाटील यांच्या कन्या प्रिया गदादे या राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याकडून निवडणुकीला उभ्या आहेत. याबाबत आरोग्य निरीक्षक ललिता तमनर यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तमनर यांची प्रभाग २५, २७, २८मध्ये भरारी पथक प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही, याची काळजी घेणे, निवडणूक विषयक तक्रारींचे निराकरण करणे, हे या गटाचे काम आहे. २८ डिसेंबरला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पर्वती पायथा रोड येथील गदादे पाटील यांच्या कार्यालयासमोर कॅनॉल पुलावर आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने तेथे भेट दिली.
त्या ठिकाणी टेम्पोवर राष्ट्रवादीची निशाणी घड्याळाचे चिन्ह व शिवाजी गदादे पाटील यांचे इतर राजकीय नेत्यांचे फोटो होते. तसेच दोन रिक्षांना होडीचा आकार दिलेले बॅनर, असाच मजकूर असलेले बॅनर लावलेले व स्पिकरचे भोंगे लावलेल्या दोन रिक्षा दिसून आल्या. या टेम्पो व रिक्षा प्रचार करतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रसारीत झालेला आहे. या भरारी पथकाने पंचनामा करून पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बसवराज माळी करत आहेत