Video : भाजपकडून रवींद्र धंगेकर यांची कोंडी, प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढविणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 15:20 IST2025-12-28T15:18:28+5:302025-12-28T15:20:47+5:30
- मुलाच्या राजकीय निर्णयावर बोलताना त्यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले, तो माझा मुलगा आहे, रवींद्र धंगेकरचं रक्त आहे.

Video : भाजपकडून रवींद्र धंगेकर यांची कोंडी, प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढविणार
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना यांची युती होणार आहे; पण जागावाटपावरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. त्यातच शिंदेसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांची जागावाटपामध्ये भाजपकडून कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. निवडून न येणाऱ्या जागा भाजप आम्हाला देत असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २४ मधून रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर हे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे महापालिकेच्या जागावाटपामध्ये दोन्ही पक्षांमध्ये तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे शिंदेसेनेचे नेते आणि पदाधिकारी नाराज झाले आहेत. शिंदेसेनेला हव्या असलेल्या जागा भाजप देण्यास तयार आहे. त्या जागांवरती कधी शिंदेसेना किंवा भाजप निवडून आली नाही त्या जागा दिल्या जात असल्याची खदखद शिंदेसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केली. त्यानंतर आता भाजप-शिंदेसेनेची युती होईल की नाही, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. त्यातच माजी आमदार रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेण्याची तयारी आहे. प्रभाग क्रमांक २४ मधून प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. त्यांच्या भावनांचा विचार करून पक्षाने त्यांना सन्मान दिला पाहिजे, फक्त आमच्याच पक्षाचे नाही तर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे. या हेतूने आमचे शिष्टमंडळ एकनाथ शिंदे यांना भेटले, त्यानंतर उदय सामंत यांना भेटले. जर पुणे शहरामध्ये कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल तर मग निवडणुका कोणासाठी लढवायच्या, हा महत्त्वाचा विषय आहे, त्याचबरोबर भाजपने जो प्रस्ताव आमच्या शिंदेसेनेला दिला आहे, तो प्रस्ताव आम्हाला मान्य नाही, त्यांनी ज्या जागा आम्हाला ऑफर केल्या आहेत, त्या जागेवर कधी भाजपही निवडून आलं नाही किंवा शिंदेसेनाही निवडून आलेली नाही, त्या जागा घेऊन आम्ही काय करणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.