PMC Election 2026 : हजारो तरुणांना नोकरीची संधी देणारा लाईट हाऊस प्रोजेक्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:00 IST2026-01-10T12:59:00+5:302026-01-10T13:00:04+5:30
- वस्तीभागातील अनेक तरुण-तरुणींना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण पूर्ण करता येत नाही.

PMC Election 2026 : हजारो तरुणांना नोकरीची संधी देणारा लाईट हाऊस प्रोजेक्ट
पुणे: वस्तीभागातील तरुण मुला-मुलींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने पुणे भाजपचे निवडणूक प्रमुख व प्रभाग २४ डचे उमेदवार गणेश बिडकर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’ अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. शिक्षणाअभावी रोजगाराच्या संधींपासून वंचित राहणाऱ्या तरुणांच्या कला-कौशल्यांना योग्य दिशा देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम या उपक्रमातून सुरू आहे.
वस्तीभागातील अनेक तरुण-तरुणींना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण पूर्ण करता येत नाही. मात्र, शिक्षण नसले तरी त्यांच्यात विविध कौशल्ये आणि काम करण्याची जिद्द असते. ही बाब लक्षात घेऊन २०२१ साली सोमवार पेठेतील भोलागिरी येथील महानगरपालिकेच्या शाळेत ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’ची सुरुवात करण्यात आली.
या प्रकल्पाचा लाभ कसबा पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ आणि गणेश पेठ परिसरातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या तरुणांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. १८ ते ३० वयोगटातील तरुण-तरुणींना एक महिन्याचे सघन प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मिती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या प्रशिक्षणामुळे तरुणांना स्वतःची करिअरविषयक स्वप्ने साकार करण्याची संधी मिळत असून कुटुंबाच्या उपजीविकेसाठीही भक्कम आधार निर्माण होत आहे. २०२१ ते २०२५ या कालावधीत या प्रकल्पांतर्गत १५०० हून अधिक तरुण-तरुणींनी प्रशिक्षण घेतले असून, त्यापैकी साडेपाचशेहून अधिक जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. हे आकडे या उपक्रमाच्या यशाची साक्ष देणारे आहेत.
प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी इच्छुक तरुण-तरुणींची करिअर टेस्ट घेतली जाते. त्यांच्या आवडीनिवडी, क्षमता आणि व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून त्यानुसार योग्य क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाते. टॅली, कॉम्प्युटर ऑपरेटर, टेलरिंग, ब्युटी पार्लर, हेल्थ सेक्टर, जिम इन्स्ट्रक्टर, नर्सिंग असिस्टंट, कुकिंग, ग्राफिक डिझाईन तसेच विविध सॉफ्टवेअर लँग्वेजेस यांसारख्या अनेक व्यावसायिक कोर्सेसचा यात समावेश आहे.
गरजाधिष्ठित आणि उच्च दर्जाच्या प्रशिक्षणामुळे वस्तीभागातील अनेक तरुणांचे जीवनमान उंचावले आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमामुळे अनेक तरुण गुन्हेगारी किंवा चुकीच्या मार्गापासून दूर राहून मुख्य प्रवाहात येत स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवत आहेत. लाईट हाऊस प्रोजेक्ट’च्या माध्यमातून तरुणांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण करत समाजघडणीचे भक्कम कार्य गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.