PMC Elections 2026: पुण्यात साडेअकरालाच गुलाल उधळणार..! कोणत्या प्रभागांचे निकाल आधी येणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 18:43 IST2026-01-14T18:42:27+5:302026-01-14T18:43:33+5:30
मतमोजणीचा सर्वाधिक २० फेऱ्या धनकवडी सहकारनगर; पहिला निकाल साडेअकराच्या दरम्यान

PMC Elections 2026: पुण्यात साडेअकरालाच गुलाल उधळणार..! कोणत्या प्रभागांचे निकाल आधी येणार ?
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सर्वाधिक २० फेऱ्या या धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या तीन प्रभागांमध्ये होणार असून सर्वात कमी १२ फेऱ्या बिबवेवाडी, कसबा विश्रामबाग आणि कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागांच्या होणार आहेत. त्यामुळे पहिला निकाल साडेअकरापर्यंत येण्याची शक्यता असल्याने दुपारी दोनपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारी रोजी मतमोजणी होईल. यासाठी ४१ प्रभागातून १६५ सदस्य निवडून येतील. यातील ४० प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय १५ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत. प्रभागनिहाय मतमोजणी फेऱ्यांचा विचार करता सर्वात कमी चार फेऱ्या १३ प्रभागांमध्ये होणार असून येथील निकाल लवकर जाहीर होईल. पाचसदस्यीय प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-आंबेगाव-कात्रजमध्ये १० फेऱ्या होणार आहेत, त्यामुळे या प्रभागाच्या निकालाला विलंब होऊ शकतो.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय दोनच प्रभागांचा समावेश असलेल्या कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक ३९ अप्पर सुप्पर इंदिरानगर व प्रभाग क्रमांक ४० कोंढवा बुद्रुक येवलेवाडी मध्ये प्रभागनिहाय सर्वाधिक प्रत्येकी १२ फेऱ्या होणार आहेत. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय (प्रभाग क्रमांक २०,२१,२६) व कसबा विश्रामबागवाडा (प्रभाग २५,२७,२८) क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत तसेच कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सर्वात कमी १२ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे येथील मतमोजणी लवकर पूर्ण होऊन या प्रभागांचा निकाल सर्वात लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.
‘मतमोजणीसाठी एका फेरीला साधारण अर्धा तास लागण्याची शक्यता आहे. पहिला निकाल साडेअकरापर्यंत जाहीर होऊ शकतो. तर साडेतीन-चारपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल,’ असे महापालिकेचे निवडणूक उपायुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितले.