PMC Elections : भाजपची १०० उमेदवारांची पहिली यादी तयार, उद्या जाहीर होणार यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 09:36 IST2025-12-25T09:35:29+5:302025-12-25T09:36:46+5:30
- महापालिकेत एकहाती सत्ता आणण्याचा निश्चय भाजपने केला असून, १२८ नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष ठेवले आहे

PMC Elections : भाजपची १०० उमेदवारांची पहिली यादी तयार, उद्या जाहीर होणार यादी
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी भाजपची १०० उमेदवारांची पहिली यादी तयार असून प्रदेश कार्यालयाची मान्यता मिळाल्यानंतर ही यादी उद्या (शुक्रवारी) जाहीर करण्यात येणार आहे. उर्वरित ४० ते ५० उमेदवारांच्या नावांवर कोअर कमिटीच्या बैठकीत एकमत झाले नाही. त्यामुळे ही नावे प्रदेश पातळीवरील नेत्यांकडे पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महापालिकेत एकहाती सत्ता आणण्याचा निश्चय भाजपने केला असून, १२८ नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बुधवारी आपटे रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बीडकर, राजेश पांडे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते.
या बैठकीमध्ये विधानसभानिहाय प्रभागांबाबत चर्चा करण्यात आली. संबंधित विधानसभा मतदारसंघातील आमदार तसेच तेथील पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत कोअर कमिटीने प्रभागनिहाय उमेदवारांची नावे या बैठकीत निश्चित करण्यात आली. ज्या नावांवर एकमत झाले, त्या नावांवर शिक्कामोर्तब करून यादी तयार करण्यात आली. प्रभागातील ज्या नावांवर एकमत झालेले नाही, त्याची स्वतंत्र यादी तयार करून ती प्रदेश पातळीवरील नेत्यांकडे पाठवण्याचा निर्णय झाला, अशी माहिती भाजपमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली.
कोअर कमिटीच्या बैठकीत शंभर उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. ४० ते ५० उमेदवारांच्या नावांवर कमिटीच्या सदस्यांचे एकमत झाले नाही. विधानसभानिहाय प्रभागातील उमेदवारांची नावे संबंधित विधानसभेचे आमदार, तसेच तेथील वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निश्चित करण्यात आली आहेत. ही यादी शुक्रवारी २६ डिसेंबरला जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उर्वरित उमेदवारांच्या नावावर चर्चा करून दुसऱ्या टप्प्याची यादी जाहीर केली जाईल, असेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
जागावाटपाचा तिढा जाणार वरिष्ठांच्या कोर्टात
महापालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना (शिंदेेसेना) युतीच्या माध्यमातून लढविणार आहेत. त्यानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या चर्चा सुरू आहेत. शहरातील शिवसेनेला ३४ जागा हव्या आहेत. मात्र, भाजपची तयारी केवळ १६ जागा सोडण्याची आहे. त्यामुळे जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना सोडवावा लागणार आहे.