PMC Elections : भाजप-शिंदेसेनेची युती तुटली; पुणे महापालिकेत चौरंगी लढत, राजकीय चित्र स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 23:25 IST2025-12-30T23:24:53+5:302025-12-30T23:25:01+5:30
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे निवडणूक चुरशीची

PMC Elections : भाजप-शिंदेसेनेची युती तुटली; पुणे महापालिकेत चौरंगी लढत, राजकीय चित्र स्पष्ट
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही भाजप आणि शिंदेसेना यांची युती झालेली नाही. त्यामुळे शिंदेसेनेने ही निवडणूक स्वबळावर लढविण्याचे ठरवून सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि काँग्रेस, उद्धवसेना व मनसे यांची आघाडी झाली आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. त्याने पालिका निवडणूक चौरंगी होणार असल्याचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) दोन्ही एकत्र आल्यामुळे आणि शिंदेसेना स्वबळावर निवडणूक लढविणार असल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.
पुणे महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि शिंदेसेना एकत्र लढणार आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) बरोबर मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे पुण्यात जाहीर केले होते. मात्र सन्मानपूर्वक जागा न दिल्यामुळे शिंदेसेना नाराज होती. भाजप केवळ शिंदे सेनेला १५ ते १७ जागा देत होते. त्यामुळे शिंदे सेनेचे नेते आणि इच्छुक उमेदवार नाराज झाले होते. त्यामुळे शिंदे सेनेच्या स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. भाजपकडून शिंदेसेनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट दोन भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर भाजपकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे रात्री उशिरा शिंदे सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
पुण्यात सन्मानजनक जागा मिळत नसतील तर आम्ही स्वबळावर लढू, असा निर्धार आमदार विजय शिवतारे यांनी व्यक्त केला होता. रात्री १२ वाजताच पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची घोषणा करणार होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीमुळे ही घोषणा होऊ शकली नाही. त्यानंतर तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मंत्री उदय सामंत यांना पुण्यात पाठवले. त्यानुसार मंगळवारी सकाळी उदय सामंत यांच्या उपस्थितीत पुण्यातील प्रमुख शिंदेसेना नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यानंतर भाजप आणि शिंदेसेनेची युती तुटल्यात जमा झाली आहे. सर्व उमेदवारांना आम्ही एबी फॉर्म देणार असल्याचे शिंदेसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी सांगितले. त्यानंतर शिंदेसेेना १६५ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे शिंदेसेनेचे पुणे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. त्यानंतर शिंदेसेनेच्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. भाजपनेही १०० जागांवरील उमेदवारांना आगोदर एबी फॉर्म दिले होते. उर्वरित जागा वरील उमेदवारांनाही एबी फॉर्म दिले. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेची युती तुटली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या दोन्ही राष्ट्रवादीच्या जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्याने चर्चा फिस्कटली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी हे महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावत होते. मात्र, महाविकास आघाडीच्या बैठकीला अचानकपणे राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या पक्षातील कोणताही पदाधिकारी उपस्थित राहिला नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेपाठोपाठ पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) दोन्ही एकत्र आले. त्याबाबतची अधिकृत घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिका निवडणूक काँग्रेस आणि उद्धवसेना एकत्र लढणार आहेत. उद्धवसेनेची आणि मनसेची युती झाली आहे. उद्धवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागेतून मनसेला काही जागा देण्यात येणार आहे. भाजप आणि शिंदेसेनेची युती न झाल्यामुळे चौरंगी लढत होणार आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, शिंदेसेना स्बळावर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ने महाविकास आघाडीबरोबर काडीमोड घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाबरोबर घरोबा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) दोन्ही एकत्र आल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.
अर्ज माघारीपर्यंत होऊ शकते युती
पुणे महापालिका निवडणूक जागावाटपात महायुतीमधील भाजपा आणि शिंदेसेना यांच्यात एकमत होऊ शकलेले नाही. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, पण अर्ज माघारी घेण्याची मुदत २ जानेवारी आहे. मी स्वत: याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेच्या युतीबाबत अर्ज माघारी घेण्यापर्यंत निर्णय होऊ शकतो असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.