PMC Elections : भाजप-शिंदेसेनेच्या जागा वाटपाचा तिढा कायम;शिंदेसेनेच्या नेत्यांमध्येही मतभेद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 11:41 IST2025-12-28T11:40:37+5:302025-12-28T11:41:54+5:30
- महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेसेनेची युती होणार का?

PMC Elections : भाजप-शिंदेसेनेच्या जागा वाटपाचा तिढा कायम;शिंदेसेनेच्या नेत्यांमध्येही मतभेद
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ दोन दिवस शिल्लक राहिले असतानाही भाजप व शिंदेसेना यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेत नाही. त्यातच जागांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिंदेसेनेच्या नेत्यांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये नेत्यांमध्ये मतभेद झाल्याने शहरप्रमुख नाना भानगिरे बैठकीतून बाहेर पडले. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेसेनेची युती होणार का? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. तरीही भाजप - शिंदेसेना, दोन राष्ट्रवादी आणि काँग्रेस, उद्धवसेना, मनसे यांच्या युती आणि आघाडीमध्ये अजूनही ताळमेळ लागताना दिसत नाही.
भाजप आणि शिंदेसेनेच्या जागा वाटपाचा तिढाही कायम आहे. शिंदेसेनेने भाजपकडे २५ जागांची मागणी केली आहे. परंतु, भाजपकडून त्याला प्रतिसाद दिला जात नाही. या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेच्या नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीला विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे, शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे आदी उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीमध्ये जागा मागण्यावरून काहीसे मतभेद झाल्यामुळे भानगिरे बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडले. त्यानंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर हे बैठकीसाठी आले.
गोऱ्हे म्हणाल्या, सन्मानजनक युती व्हावी, अशी भूमिका आहे. या प्रक्रियेदरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली. सध्या चर्चेचा अंतिम टप्पा सुरू असून, दोन्ही पक्षांमध्ये संवाद सुरू आहे. बैठकीतून भानगिरे बाहेर पडल्यासंदर्भात विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, हा प्रकार गैरसमजातून घडला असून, त्याचा योग्य तो खुलासा होईल. त्यांना अचानक एक फोन आला आणि त्यानंतर त्यांना एक निरोप देण्यात आला. त्या फोनवर काय बोलणे झाले, याची मला माहिती नाही आणि त्यांनी माध्यमांना नेमके काय सांगितले, हेही मला ठाऊक नाही. मात्र, भानगिरे यांचा गैरसमज नक्कीच दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.