PMC Elections : दमदार संघटना, पक्ष शिस्तीमुळे भाजप वरचढ; महापालिका निवडणुकीसाठी काटेकोर नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:06 IST2025-12-27T13:05:26+5:302025-12-27T13:06:57+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत भाजपच्या शहर पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठका नुकत्याच मुंबईत झाल्या.

PMC Elections : दमदार संघटना, पक्ष शिस्तीमुळे भाजप वरचढ; महापालिका निवडणुकीसाठी काटेकोर नियोजन
पुणे : उद्धवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस हे तिन्ही मुख्य विरोधी पक्ष बंडखोरी, गळती, निरुत्साह यात गुरफटलेले असताना भारतीय जनता पक्ष मात्र मजबूत संघटनेच्या बळावर एकसंधपणे महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज झाला आहे. मजबूत संघटना आणि पक्ष शिस्त यामुळे भाजप वरचढ ठरताना दिसत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत भाजपच्या शहर पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठका नुकत्याच मुंबईत झाल्या. उमेदवार यादी अंतिम करण्यासोबतच पक्षाची संघटनात्मक शक्ती कार्यक्षम ठेवण्याचे नियोजन यावेळी अत्यंत बारकाईने करण्यात आले. राज्यातील नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष आणि सर्वाधिक नगरसेवक अशी विक्रमी कामगिरी करत भाजप राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला. या यशामुळे हुरळून न जाता पूर्ण ताकदीनिशी भाजप महापालिका निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे.
तात्विक मतभेदांमुळे राष्ट्रवादीच्या (शरद पवार) शहराध्यक्षांनी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उद्धवसेना २०१७ मध्ये निवडून आलेल्या सर्व दहा नगरसेवकांनी पक्ष सोडल्याने शिवसेनेचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेमुळे काँग्रेस एकाकी पडण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने बुथस्तरीय रचना कार्यक्षम करण्यावर भर दिला आहे. आजी-माजी पदाधिकारी, नवे-जुने कार्यकर्ते, आमदार-खासदार या सर्वांमध्ये समन्वय राखणारी यंत्रणा भाजपने कार्यान्वित केली आहे. शहरातील मुख्य चौकांत होर्डिंग्ज लावून भाजपने प्रचारातही आघाडी घेतल्याचे दिसून येते.
२०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला ‘शत प्रतिशत’ यश दिले. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी विक्रमी जागा भाजपच्या पारड्यात टाकल्या. त्यानंतर २०१९ व २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतदेखील पुणेकरांनी पुन्हा भाजपलाच दणदणीत विजयाचे मानकरी केले. या प्रत्येक निवडणुकीत भाजपवरचा पुणेकरांचा विश्वास दृढ झाला. सर्वाधिक सक्रिय कार्यकर्ते आणि दररोज लोकांच्या सुख-दुःखात सहभागी असणारा पक्ष ही भाजपची ओळख आहे. त्यामुळे आपला नगरसेवक भाजपचाच असला पाहिजे, असे पुणेकरांचे मत आहे. - धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप