PMC Elections : भाजपमधील इच्छुकांची वाढली धाकधूक; आयारामांच्या चलतीमुळे निष्ठावंतांचा पत्ता कट होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 12:38 IST2025-12-26T12:38:08+5:302025-12-26T12:38:42+5:30
महापालिका निवडणुकीत १२०पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष शहर भाजपने ठेवले आहे.

PMC Elections : भाजपमधील इच्छुकांची वाढली धाकधूक; आयारामांच्या चलतीमुळे निष्ठावंतांचा पत्ता कट होणार
पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नेत्यांनी इतर पक्षातील नेत्यांना प्रवेश देताना स्थानिक आमदारांना विश्वासात घेतले नाही. यावरून वादावादी झाल्यानंतर आमदारांच्या समन्वयाने भाजपच्या कोअर कमिटीने शंभर ते सव्वाशे उमेदवारांची पहिली यादी अंतिम करून प्रदेश कार्यालयाकडे पाठवली. या पहिल्या यादीत आपला नंतर लागतो की नाही, या विचाराने भाजपच्या इच्छुुकांची धाकधूक वाढली आहे. मात्र, आयारामांची चलती असल्याने निष्ठावंतांचा पत्ता कट होणार आहे.
महापालिका निवडणुकीत १२०पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष शहर भाजपने ठेवले आहे. त्यानुसार ज्या प्रभागांमध्ये भाजप कमजोर आहे, त्या प्रभागातील इतर पक्षांच्या प्रबळ नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजप नेत्यांकडून सुरू आहेत. मागील काही दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असलेल्या वडगाव शेरी व खडकवासला मतदार संघातील नेत्यांना व इच्छुकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आले आहेत. उध्दवसेनेच्या दोन्ही गट नेत्यांचे प्रवेश झाले. पुढील दोन ते तीन दिवसांत आणखी प्रवेश होणार आहेत. प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिंदेसेना सोडून इतर विविध पक्षातील नेत्यांची व इच्छुकांची नावे आहेत.
मात्र, हे पक्ष प्रवेश स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता केल्याने शहर भाजपमध्ये काहीसी नाराजी व वादावादी झाली होती. भाजपच्या कोअर कमिटीने अखेर आमदारांसोबत चर्चा करून १६५पैकी १०० ते १२५ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. या नावांची यादी प्रदेश कार्यालयाला पाठवण्यात येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम यादीस मंजुरी देणार आहेत. उर्वरित नावांवर एकमत न झाल्याने त्याची यादी तयार करून तीही यादी प्रदेश कार्यालयास पाठवली जाणार आहे. याशिवाय शिंदेसेना आणि आठवलेंच्या रिपाइंलाही जागा सोडायच्या आहेत. त्यामुळे भाजप एकूण किती जागा लढवणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीचा शब्द मिळाल्यानेच इतर पक्षातील इच्छुकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उमेदवारी देण्यात आयारामांची चलती आहे. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांचा पत्ता कट होणार आहे. मात्र, ज्या प्रभागात इतर पक्षातील इच्छुकांचे प्रवेश झालेले नाहीत, त्या प्रभागातील इच्छुक पहिल्या यादीत आपले नाव असेल का, या विचाराने चिंतीत आहेत. त्यामुळे त्यांची धाकधूक वाढली आहे.