PMC Elections : आघाडी, युती ठरेना; महापालिकेची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांची प्रचाराला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 09:40 IST2025-12-27T09:38:25+5:302025-12-27T09:40:54+5:30
सर्वच राजकीय पक्षांतील ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळण्याची खात्री आहे, त्यांनी उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केल्याचे चित्र आहे

PMC Elections : आघाडी, युती ठरेना; महापालिकेची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांची प्रचाराला सुरुवात
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास चार दिवस झाले आहे; पण अद्यापही भाजप आणि शिंदेसेना, आरपीआयची युती आणि दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी, महाविकास आघाडी, उद्धवसेना आणि मनसेची युती जाहीर झालेली नाही. जागावाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरू आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांतील ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळण्याची खात्री आहे, त्यांनी उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केल्याचे चित्र आहे. त्यात घरोघरी जाऊन परिचय पत्रके वाटप करण्याबरोबरच एलईडी व्हॅन, प्रचाराची वाहने प्रभागात फिरू लागली आहेत.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार), उद्धवसेना, शिंदेसेना आणि मनसे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश सुरू आहेत. त्यामुळे उमेदवारी यादी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे; पण भाजप आणि शिंदेसेना, आरपीआयची युती आणि दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी, महाविकास आघाडी, उद्धवसेना आणि मनसेची युती जाहीर झालेली नाही. जागावाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरू आहे. बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्ष उशिरा उमेदवारी यादी जाहीर करणार आहेत. या निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस ३० डिसेंबर आहे. त्यामुळे २९ आणि ३० डिसेंबर रोजी सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यानंतर ३ जानेवारी रोजी चिन्हवाटप होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ३ जानेवारीनंतरच प्रचाराला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी ४८ तास जाहीर प्रचार संपणार आहे. त्यामुळे दि. ४ ते दि. १३ जानेवारी हा १० दिवसांचाच कालावधी प्रचारासाठी खऱ्या अर्थाने मिळणार आहे. या दहा दिवसांमध्ये दोनच रविवार मिळत आहेेत; त्यामुळे उमेदवारी मिळण्याची खात्री असणाऱ्यांनी आतापासून प्रचाराचे नियोजन करून सुरुवात केली आहे.
भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीतील ज्या इच्छुकांना उमेदवारीची खात्री आहे, त्यांनी प्रभागातील घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे. त्यावेळी केलेल्या कामाचा अहवाल दिला जात आहे. त्याचबरोबर काही माजी नगरसेवकांनी प्रभागात केलेली विकासकामे दर्शविण्यासाठी एलईडी व्हॅन तयार केल्या आहेत. या व्हॅनवर उमेदवारीची माहिती, कार्याची माहिती दिली जात आहे. विशेषकरून या एलईडी व्हॅन रस्त्यावरील मुख्य चौकात उभ्या केल्या जात आहेत. काही इच्छुक तर प्रचाराची वाहने प्रभागांत फिरवू लागले आहेत. विशेष करून रिक्षाच्या पाठीमागे प्रभाग क्रमांक, नाव, छायाचित्र आणि पक्षाचे चिन्ह छापलेले पोस्टर लावून प्रचार केला जात आहे. काही इच्छुकांकडून नवीन वर्ष सुरू होणार असल्यामुळे, प्रभागात मोठ्या प्रमाणात दिनदर्शिकांचे मोफत वाटप केले जात आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार) इच्छुकांमध्ये चिन्हामुळे संभ्रमात
राष्ट्रवादी (शरद पवार) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) हे दोन्ही एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या उमेदवाराने घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा एक मतप्रवाह आहे; तर ‘तुतारी’वरच निवडणूक लढवावी असा एक मतप्रवाह आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील इच्छुक चिन्हाच्या गोंधळामुळे संभ्रमात आहेत.