PMC Elections 2026: पुण्यात भाजपविरुद्ध भिडण्यासाठी अजित पवारांची गोळाबेरीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 13:11 IST2025-12-23T13:10:19+5:302025-12-23T13:11:43+5:30
Pune Municipal Election 2026: शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेससोबत आघाडीचा प्रयत्न; काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोन केल्याची सूत्रांची माहिती

PMC Elections 2026: पुण्यात भाजपविरुद्ध भिडण्यासाठी अजित पवारांची गोळाबेरीज
पुणे : पुणे जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये बलाढ्य भाजपला टक्कर देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोळाबेरीज करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेस पक्षासोबत आघाडीचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याला फोन करून पुणे महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे महापालिकेची निवडणूक साडेतीन वर्षांनंतर होणार आहे. महापालिका प्रभाग रचनेवर राज्यातील सत्तेतील मोठा भाऊ असलेल्या भाजपचा प्रभाव जाणवतो. प्रभाग रचना तयार करताना सत्तेतील पक्ष म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विचारात घेतले जाईल, अशी अपेक्षा त्यांच्या नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची होती. मात्र, तसे झाले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व २९ महापालिकांच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेला सोबत घेण्याची घोषणा केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि आम्ही समोरासमोर लढणार असल्याचे स्पष्ट केले. भाजपने प्रभाग रचनेत विचारात घेतले नाही आणि आता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना आणि प्रबळ इच्छुकांना भाजपमध्ये घेण्याचे सत्र सुरू आहे.
या सर्व घडामोडींमुळे कोंडीत सापडलेल्या अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत समविचारी मतांची विभागणी टाळली तर निवडून येणे सोपे जाते, असे म्हणत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडीचे सूतोवाच रविवारी केले होते. त्यादृष्टीने सोमवारी दिवसभर काही हालचाली झाल्या. त्यांच्या पक्षाचे माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी स्पष्ट शब्दांत दोन राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे माध्यमांना सांगितले. तर दुसरीकडे अजित पवार यांनी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याला फोन करून पुणे महापालिकेसाठी आघाडीचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या संबंधित बड्या नेत्याला विचारल्यानंतर त्यांनी दुजोरा दिला. दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे निश्चित झाले असून, केवळ घोषणा बाकी आहे.