PMC Elections : अजित पवार एकाकी, तिरंगी लढतींची शहरात शक्यता; नवे उमेदवार शोधण्याची राष्ट्रवादीवर वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 12:26 IST2025-12-28T12:25:32+5:302025-12-28T12:26:34+5:30
- भाजपने राष्ट्रवादीच्या तगड्या पदाधिकाऱ्यांना गळाला लावल्याने अजित पवार यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात नव्याने उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.

PMC Elections : अजित पवार एकाकी, तिरंगी लढतींची शहरात शक्यता; नवे उमेदवार शोधण्याची राष्ट्रवादीवर वेळ
पुणे : महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष एकाकी पडला आहे. त्यामुळे शहरात या निवडणुकीत तिरंगी लढती हाेण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तसेच भाजपने राष्ट्रवादीच्या तगड्या पदाधिकाऱ्यांना गळाला लावल्याने अजित पवार यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात नव्याने उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता वर्तविली जात होती. ती शक्यता शुक्रवारी मावळली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)सोबत जाण्याची चिन्हे होती; त्यामुळे महाविकास आघाडीचे गणित बिघडले हाेते. मात्र, दाेन्ही राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये काेणते चिन्ह घेऊन लढायचे हा वादाचा मुद्दा ठरल्यानंतर हे दाेन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आता महाविकास आघाडीसाेबत जाणार आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चा समावेश हाेणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले हाेते. काॅंग्रेसने विराेध केल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे महाविकास आघाडीत समावेश हाेण्याची दारे बंद झाली होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसला आता स्वबळावरच निवडणूक लढवावी लागणार आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शहरातील बहुतांश नगरसेवक हे अजित पवार यांच्यासाेबत गेले हाेते. तर काही नगरसेवक हे शरद पवार गटाकडे होते. हडपसरचे आमदार चेतन तुपे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)कडून निवडून आले आहेत. मात्र, भाजपने याच मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते गळाला लावले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. तर शरद पवार यांना मानणारा मतदार या मतदारसंघात असल्याने अजित पवार यांच्या पक्षासमाेर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे आव्हानही असेल.
मागील काही दिवसांत झालेल्या राजकीय घडामाेडीत अजित पवार यांच्यासाेबत गेलेल्या माजी नगरसेवकांपैकी काहीजणांनी हातात कमळ घेतले आहे. त्यामुळे अशा प्रभागात पक्षाला नवीन उमेदवार शाेधावा लागणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत दाेन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या बैठका सुरू हाेत्या. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी स्वतंत्र बैठक घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत जागावाटप व चिन्हाबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)कडून ‘घड्याळ’ चिन्हाचा आग्रह धरण्यात आल्याची चर्चा असून, त्याला नकार मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ची पुन्हा स्वतंत्र बैठक झाली. दिवसभराच्या घडामोडीनंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)ने महाविकास आघाडीबरोबरच कायम राहण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.