PMC Elections 2026:पुणे महापालिका निवडणूक प्रचाराकडे ठाकरे बंधूनी फिरविली पाठ; नेमकं कारण काय ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:06 IST2026-01-10T10:05:25+5:302026-01-10T10:06:51+5:30
मुंबईप्रमाणे दोन्ही बंधूंनी पुण्यातील युतीच्या प्रचारासाठी यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र अद्याप दोन्ही बंधूंकडून हिरवा कंदील मिळालेला नाही.

PMC Elections 2026:पुणे महापालिका निवडणूक प्रचाराकडे ठाकरे बंधूनी फिरविली पाठ; नेमकं कारण काय ?
पुणे : महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी युती आणि आघाडीच्या उमेदवारांसाठी पदयात्रा, जाहीरसभा यांचा धडाका लावला आहे. मात्र निवडणुकीत उद्धवसेना आणि मनसे यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू असताना उद्धवसेनेचे कार्यकारी प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे यांनी मात्र उमेदवारांच्या प्रचाराकडे पाठ फिरविली आहे.
महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली आहे. त्यामुळे उद्धवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांच्या आशा उंचावल्या आहेत. मुंबईप्रमाणे दोन्ही बंधूंनी पुण्यातील युतीच्या प्रचारासाठी यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र अद्याप दोन्ही बंधूंकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. त्याच वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी (अजित पवार) चे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात ठाण मांडून आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांसाठी नेत्यांची फौज पुण्यात ये-जा करीत आहे. शिंदे सेनेचे उदय सामंत, डॉ. नीलम गोऱ्हे, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रचारासाठी हजेरी लावली असून, विविध कार्यक्रम घेतले आहेत. मात्र पुणे महापालिका निवडणुकीत उद्धवसेना आणि मनसे यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू असताना त्यांची एकत्रित सभा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र ही सभा होणार नसल्याचे पदाधिकाऱ्यांकडूनच सांगण्यात आले आहे.