PMC Elections 2026: पीएमपी बस निवडणुकीसाठी वापरल्याने प्रवाशांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:56 IST2026-01-14T19:55:39+5:302026-01-14T19:56:24+5:30
शहरात दररोज धावणाऱ्या १,७५० बसपैकी तब्बल १,०५६ बस निवडणूक कामासाठी वापरत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाल्याचे दिसून आले.

PMC Elections 2026: पीएमपी बस निवडणुकीसाठी वापरल्याने प्रवाशांना फटका
पुणे : महापालिका निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाने पीएमपीच्या ताफ्यातील १,०५६ बस आरक्षित केल्या आहेत. यामुळे शहरातील पीएमपी बसच्या फेऱ्यांमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. याचा फटका प्रवाशांना बसला आहे. शहरात दररोज धावणाऱ्या १,७५० बसपैकी तब्बल १,०५६ बस निवडणूक कामासाठी वापरत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाल्याचे दिसून आले.
पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरएडी हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते. यातून दररोज १० लाखांहून अधिक नागरिक प्रवास करतात, परंतु बस मतपेट्या घेऊन जाण्यासाठी वापरल्याने पीएमपीच्या ताफ्यात फक्त ६९४ बस शिल्लक असल्यामुळे बस थांब्यांवर प्रवाशांना बराच वेळ थांबावे लागले, शिवाय नियमित धावणाऱ्या बस या एक तासाच्या अंतराने धावत होते.
दोन दिवसांपूर्वी पीएमपी प्रशासनाकडून याबाबत जाहीर प्रसिद्ध करण्यात आले होते, परंतु प्रवासी संख्या जास्त असल्यामुळे ज्या बस धावत होत्या, त्या भरून धावत होते, शिवाय बसला उशीर झाल्यामुळे बरेच प्रवासी बस थांब्यांबर थांबलेले दिसून आले. केवळ ३५ टक्के बस रस्त्यावर असल्याने प्रवाशांना यांचा मोठा फटका बसला आहे.