PMC Elections 2026: पुण्यात नव्या चेहऱ्यांना संधी; शिंदेसेनेसोबत युतीच्या चर्चा निष्फळ, भाजपला २ गोष्टी अडचणीच्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 09:58 IST2025-12-31T09:56:51+5:302025-12-31T09:58:17+5:30
PMC Elections 2026 भाजपने सर्व १६५ जागांसाठी आपल्या इच्छुकांना एबी फॉर्म देऊन अर्ज भरून घेतले असून तर शिंदेसेनेनेही भाजपकडून किती जागा सोडल्या जातील, याची वाट न पाहता मंगळवारी आपल्या इच्छुकांना एबी फॉर्म वाटप केले

PMC Elections 2026: पुण्यात नव्या चेहऱ्यांना संधी; शिंदेसेनेसोबत युतीच्या चर्चा निष्फळ, भाजपला २ गोष्टी अडचणीच्या?
पुणे : महापालिकेच्या विसर्जित सभागृहातील ३० ते ४० माजी नगरसेवकांना नाकारून भाजपने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यातच शिंदेसेनेसोबत युतीच्या चर्चा निष्फळ ठरल्याने या दोन गोष्टी भाजपच्या पथ्यावर पडणार की अडचणीची ठरणार, हे निवडणुकीच्या निकालानंतरच समजणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी ४ सदस्यीय प्रभाग पद्धती अवलंबण्यात आली आहे. याच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे तब्बल ९९ नगरसेवक निवडून आले होते. चार सदस्यीय प्रभागपद्धती भाजपसाठी फायद्याची असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापालिकेच्या विसर्जित सभागृहातील म्हणजे २०१७ मध्ये निवडून आलेल्या माजी नगरसेवकांसह जवळपास अडीच हजार इच्छुकांनी भाजपकडे मुलाखती दिल्या होत्या. मात्र, भाजपने ३० ते ४० माजी नगरसेवकांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये सर्वाधिक महिला माजी नगरसेवकांचा समावेश आहे. ज्या पुरुष माजी नगरसेवकांचे तिकीट कापण्यात आले आहे, त्यांच्या पत्नीस संधी देऊन नाराजी दूर करण्यात आली आहे. मात्र, ज्या महिला माजी नगरसेविकांची उमेदवारी कापण्यात आली आहे, त्यांच्या पतींना संधी देण्यात आलेली नाही.
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेसेनेसोबत युती करण्याची घोषणा करूनही युती होऊ शकलेली नाही. भाजपने सर्व १६५ जागांसाठी आपल्या इच्छुकांना एबी फॉर्म देऊन अर्ज भरून घेतले आहेत, तर शिंदेसेनेनेही भाजपकडून किती जागा सडल्या जातील, याची वाट न पाहता मंगळवारी आपल्या इच्छुकांना एबी फॉर्म वाटप केले. त्यामुळे युतीचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. इच्छुकांची वाढती संख्या, इतर पक्षांतील नेत्यांचे व इच्छुकांचे होणारे प्रवेश, याचा विचार करून भाजपने बंडखोरी होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली. तरीही उमेदवारीमध्ये पत्ता कट झाल्याचे समजल्यानंतर अनेकांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश करून उमेदवारीची माळ गळ्यात पाडून घेतली.
मात्र, तीस ते चाळीस माजी नगरसेवकांचे पत्ते कट करून नवीन चेहऱ्यांना संधी देणे आणि शिंदेसेनेशी युती न होणे, या दोन गोष्टी भाजपच्या पथ्यावर पडणार की अडचणीच्या ठरणार, याशिवाय भाजपने उमेदवारी नाकारल्याने अजित पवारांकडे गेलेले किती महागात पडणार आहेत, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.