PMC Elections 2026: १५ जानेवारी रोजी मतदानासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी व वेळेची सवलत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:50 IST2026-01-10T10:50:31+5:302026-01-10T10:50:47+5:30
मतदानासाठी १५ जानेवारीला सुट्टी; सुट्टी देणे शक्य नसल्यास दोन तासांची सवलत द्यावी

PMC Elections 2026: १५ जानेवारी रोजी मतदानासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी व वेळेची सवलत
पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी किवा सवलत द्यावी, असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनाला दिले आहेत.
महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मध्ये पुणे शहराच्या क्षेत्रामधील सर्व मतदार, पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरीतीने बजावता यावा. त्यासाठी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी देण्यात यावी.
ज्या अधिकारी आणि कर्मचारी यांना सुट्टी देणे शक्य नाही अशा अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संबंधित विभागप्रमुख यांचेकडून दोन ते तीन तासांची विशेष सवलत देण्यात यावी, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी आदेशात नमूद केले आहे.