PMC Elections 2026: गुन्हेगारी, कोयता गँगवर बोलणाऱ्यांकडून गुन्हेगारांनाच उमेदवारी, मोहळांची दादांचं नाव न घेता टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 20:43 IST2026-01-01T20:42:32+5:302026-01-01T20:43:30+5:30
पुणेकर मतदानातून त्यांना उत्तर देतील, अशी खरमरीत टीका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

PMC Elections 2026: गुन्हेगारी, कोयता गँगवर बोलणाऱ्यांकडून गुन्हेगारांनाच उमेदवारी, मोहळांची दादांचं नाव न घेता टीका
पुणे -कोयता गँग संपली पाहिजे, शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणतात. मात्र, त्यांच्या उमेदवारांची यादी पाहिली तर या टोकापासून त्या टोकापर्यंत त्यांनी गुन्हेगारांना उमेदवारी दिली आहे. हे त्यांच्या कोणत्या तत्वात बसते, कळत नाही. गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याने पुण्यातील गुन्हेगारी वाढणार आहे, त्यामुळे पुणेकर मतदानातून त्यांना उत्तर देतील, अशी खरमरीत टीका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्यावर केली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सुरू केलेल्या मिडिया सेंटरचे उद्घाटन गुरुवारी मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोहोळ बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार योगेश टिळेकर, प्रवक्ते केशव उपाध्ये, माजी मंत्री दिलीप कांबळे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार जगदीश मुळीक उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेससह भाजपकडून पुण्यातील गुन्हेगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मोहोळ म्हणाले, गुन्हेगारांना उमेदवारी देण्याबाबत आम्ही सकारात्मक नाही. वार्ड क्रमांक ३८ मध्ये प्रतिभा रोहिदास चोरघे या अनेक वर्ष सामाजिक काम करत आहे. त्यामुळे त्यांना आम्ही उमेदवारी दिली आहे. त्यांच्या पतीची गुन्हेगारी पार्श्वभूमी मला माहिती नाही. पालकमंत्री म्हणतात शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे, आणि दुसरीकडे गुन्हेगारांना उमेदवारी देतात, ते त्यांच्या कोणत्या तत्वात बसते कळत नाही. त्यामुळे पुणेकर मतदानातून त्यांना उत्तर देतील.
केंद्र, राज्य आणि महापालिकेतील सत्येच्या माध्यमातून आम्ही पुण्यासाठी अनेक प्रकल्प दिले. अनेक प्रकल्प पूर्ण झाले असून काही प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामाच्या जोरावर महापालिकेच्या निवडणुकीत पुणेकर आम्हाला मते देतील, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला.
एका नगरसेवकाच्या जीवावर स्वबळाची भाषा -
शिंदे सेना, रिपाइंला सोबत घेऊन युतीच्या माध्यमातून महापालिका निवडणूक लढवण्याचा सुरुवातीपासूनच आमचा प्रयत्न आहे. आजही आम्ही युतीसाठी आशावादी आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बाबत जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल. मात्र, एका नगरसेवकाच्या जीवावर ते सर्व जागा लढायची भाषा करतात, असा टोलाही मोहोळ यांनी शिंदे सेनेच्या नेत्यांना लगावला.