प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 10:14 IST2025-12-26T10:13:27+5:302025-12-26T10:14:20+5:30
मी भाजपा किंवा ज्या महायुतीमुळे राज्याचे वाटोळे झाले आहे त्या तिन्ही पक्षात कुठेही जाणार नाही असं प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.

प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
पुणे - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणात उलथापालथ होताना दिसत आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम केला आहे. आता प्रशांत जगताप कोणत्या पक्षात प्रवेश करणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्यातच जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनीही प्रशांत जगताप यांना फोन करून पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.
याबाबत प्रशांत जगताप म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंचे आभार मानतो, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांशी बोलायला त्यांनी वेळ दिला. तुमचा भाजपासोबत जो लढा आहे या लढ्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. प्रबोधनकारांचे नातू आणि स्व.बाळासाहेबांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे हे राज्यात आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. भाजपाशी दोन हात करण्याची कायम तयारी ठेवणाऱ्या एवढ्या मोठ्या नेत्याने मला फोन केला. आमच्यात ९ ते १० मिनिटे संवाद झाला. त्यांनी माझ्या भावना समजून घेतल्या. आपण एकत्रितपणे आमच्यासोबत काम करू शकता अशी साद त्यांनी मला घातली अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच मी भाजपा किंवा ज्या महायुतीमुळे राज्याचे वाटोळे झाले आहे त्या तिन्ही पक्षात कुठेही जाणार नाही. आज मी राजकीय भविष्याबाबत निर्णय घेणार आहे. मी उद्धव ठाकरेंचा ऋणी राहील, त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची दखल घेतली. पुढच्या २ ते ३ तासांत मी राजकीय निर्णय घेईन. माझी लढाई संविधानासाठी आणि पुरोगामी चळवळीकरता आहे. ती कुठल्या एका पक्षाच्या, नेत्याच्या आणि व्यक्तीविरोधात नाही. आज भाजपा सरकारला आव्हान देऊ शकता अशा पक्षाची निवड मी नक्की करेन असंही प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपाचा कडवा विरोधक म्हणून उद्धव ठाकरेंची ओळख राज्यासह देशात आहे. त्यांचा पक्ष, चिन्ह आणि त्यांनी तयार केलेले कार्यकर्ते भाजपाने ज्यापद्धतीने पळवले आणि त्यांच्याच विरोधात उभे केले. त्या परिस्थितीत खचून न जाता किंवा तडजोड न करता उद्धव ठाकरे लढतायेत हीदेखील उल्लेखनीय बाब आहे. ज्यांच्यासोबत जनमताचा रेटा आहे अशा नेत्याने माझ्यासाठी ९ मिनिटे वेळ देणे ही माझ्यासाठी कायम स्वरुपीची आठवण आहे. पुढच्या २ ते ३ तासांत मी कुठल्या पक्षात जाईन ही गोष्ट वेगळी परंतु माझी पात्रता खूप छोटी आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वेळ देणे, माझ्याशी चर्चा करून तुम्ही माझ्या नेतृत्वात काम करू शकता. पुण्याच्या विकासासाठी आणि भल्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत अशा सदिच्छा व्यक्त करणे हा माझा आयुष्यातील गौरव आहे अशी भूमिका प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.