PMC Election Results 2026: पुण्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असणाऱ्या प्रभागात ‘नोटा’चा जोर; १४ टक्के नागरिकांनी उमेदवारांना नाकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:25 IST2026-01-19T12:25:19+5:302026-01-19T12:25:31+5:30
PMC Election Results 2026 सत्तेसाठी सुरू असलेली उमेदवारांची पळवापळवी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना दिलेली उमेदवारी आणि राजकीय अट्टहास याबाबत मतदारांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली

PMC Election Results 2026: पुण्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असणाऱ्या प्रभागात ‘नोटा’चा जोर; १४ टक्के नागरिकांनी उमेदवारांना नाकारले
बाणेर: पुणे महापालिकेच्या एकूण ४१ प्रभागांपैकी सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या प्रभाग क्रमांक ९ (सुस–बाणेर–पाषाण) मध्ये ‘नोटा’ला मिळालेल्या प्रतिसादाने राजकीय पक्षांची चिंता वाढवली आहे. या प्रभागात एकूण १ लाख ५६ हजार ४० मतदार असून, नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत मतदान केलेल्या ८२ हजार ६७६ मतदारांपैकी तब्बल ११ हजार ५७६ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला. त्यामुळे एकूण १४ टक्के मतदारांनी थेट उमेदवारांना नाकारत नाराजी व्यक्त केली आहे.
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, म्हाळुंगे, सोमेश्वरवाडी आणि सुतारवाडी या भागांचा समावेश असलेल्या या प्रभागात बाणेर-बालेवाडी परिसर, तसेच हिंजवडी आयटी पार्क जवळ असल्याने उच्चशिक्षित व आयटी क्षेत्रातील मतदारांचे प्रमाण मोठे आहे. सत्तेसाठी सुरू असलेली उमेदवारांची पळवापळवी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना दिलेली उमेदवारी आणि राजकीय अट्टहास याबाबत मतदारांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली.
आकडेवारीनुसार अ गटात ५,१२३, ब गटात १,३२४, क गटात ३,०४५ तर ड गटात २,०८४ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली. निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या ‘नोटा’ सुविधेचा वापर प्रत्येक निवडणुकीत वाढत असून, हे राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा असल्याचे संकेत या निकालातून मिळत आहेत.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भागातील जागरूक नागरिकांनी ‘नागरिक जाहीरनामा – मत देण्याआधी मत मांडूया’ हा उपक्रम राबवला होता. बाणेर-बालेवाडी नागरिक मंच आणि बाणेर-बालेवाडी-पाषाण रेसिडेंट्स असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष परिसरात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. “तुम्हाला तुमचा परिसर कसा हवा आहे?” या एका प्रश्नाला तब्बल ६,४०० हून अधिक नागरिकांनी प्रतिसाद दिला. हा सहभाग केवळ संख्यात्मक नसून प्रशासनाने आणि राजकीय पक्षांनी नागरिकांचे म्हणणे ऐकावे, अशी ठोस अपेक्षा व्यक्त करणारा होता. निवडून येण्याच्या नावाखाली पक्षनिष्ठेऐवजी केवळ निवडणूक जिंकण्याच्या शक्यतेवर उमेदवारी देणे, अन्य पक्षांतील उमेदवारांना पळवणे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना तिकीट देणे तसेच निवडणूक प्रक्रियेवरील प्रश्न यामुळे मतदारांचा विश्वास डळमळीत होत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये ‘नोटा’ला मिळालेला विक्रमी प्रतिसाद हा मतदारांच्या असंतोषाचा स्पष्ट संदेश मानला जात आहे.