Pune Mayor : पुणे महापालिकेत पदवाटपाची चर्चा; खडकवासला, वडगाव शेरी, शिवाजीनगर आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 21:45 IST2026-01-22T21:43:36+5:302026-01-22T21:45:01+5:30
पुणे महापालिकेत महिलाराज; महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गसाठी आरक्षित; तापकीर, नागपुरे, टिळेकर, देशपांडे, बापट, एकबोटे यांच्या नावाची जोरदार चर्चा

Pune Mayor : पुणे महापालिकेत पदवाटपाची चर्चा; खडकवासला, वडगाव शेरी, शिवाजीनगर आघाडीवर
पुणे : पुणे महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने पालिकेत महिलाराज येणार आहे. त्यामुळे या पदावर भाजपमधील नगरसेविकेची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या चौथ्यांदा निवडून आलेल्या वर्षा तापकीर यांच्यासह मंजुषा नागपुरे, रंजना टिळेकर, मानसी देशपांडे, स्वरादा बापट, निवेदिता एकबोटे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ११९ जागा मिळवून भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. महापौरपदाचीआरक्षण सोडत गुरुवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीमध्ये सहा मजल्यावर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. त्यात पुणे महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकीर या २००७, २०१२, २०१७ आणि आता निवडून आल्या आहेत. त्या सलग चौथ्यांदा सभागृहात आल्या आहेत.
२०१७ मध्ये पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असताना वर्षा तापकीर यांना कुठल्याही पदावर संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे आता वर्षा तापकीर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. नगरसेविका मंजुषा नागपुरे या २०१२, २०१७ आणि आता निवडून आल्या आहेत. त्या सलग तिसऱ्यांदा सभागृहात आल्या आहेत. नगरसेविका रंजना टिळेकर या सलग चौथ्यांदा पालिकेच्या सभागृहात आल्या आहेत. मानसी देशपांडे या तिसऱ्यांदा तर स्वरादा बापट आणि निवेदिता एकबोटे या पहिल्यांदा निवडून आल्या आहेत.
.....
महिला सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने अनेकांचे महापौरपदाचे स्वप्न भंगले
पुणे महापालिकेच्या २०१२ मध्ये महिला ओबीसीचे तर २०१७ या निवडणुकांच्या वेळी महापौरपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण होते. त्यामुळे अनेकांना महापौर होण्याची संधी मिळाली होती. पालिकेची निवडून झाल्यानंतर महापौरपदासाठी आपलेच नाव निश्चित आहे. या आशेवर भाजपमधील अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. अनेक भागात महापौरपदाच्या शुभेच्छा असे फलक देखील लावण्यात आले होते. मात्र महिला आरक्षण पडल्याने इच्छुकांची निराशा झाली आहे. त्यामुळे माजी सभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, शहराध्यक्ष धीरज घाटे, राजेंद्र शिळीमकर यांच्यासह अनेक नगरसेवकांचे महापौरपदाचे स्वप्न भंगले आहेत.
.......
भाजप कुणाला संधी देणार याची उत्सुकता
महापालिका निवडणुकीत ११९ जागा जिंकून एकहात्ती सत्ता आलेल्या भाजप महापौरपदाची माळ अनुभवी महिला नगरसेविकेच्या गळ्यात टाकणार की धक्कातंत्र वापरून नवीन महिला चेहऱ्याला संधी देणार? याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळेच आयत्या वेळी अनुभवी नावे मागे पडून अनपेक्षित नाव पुढे येईल असाही कयास बांधला जात आहे. महापालिकेत सक्षम नेतृत्व असणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराचा अनुभव असलेल्या व्यक्तीलाच महापौरपद द्यावे, अशी शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे.
.......
खडकवासला, वडगावशेरी, शिवाजीनगर मतदारसंघाला संधी मिळण्याची शक्यता
महापालिकेत २०१७ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर पहिले अडीच वर्ष कसबा आणि त्यानंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघात महापौरपद देण्यात आले. स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेतेपदी पर्वती आणि कसबा या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली. त्यामुळे यंदा खडकवासला, वडगाव शेरी, शिवाजीनगर, हडपसर विधानसभा मतदारसंघाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
.......
पुणे महापालिकेत आतापर्यंत नऊ महिला महापौर
कमल व्यवहारे २० मार्च १९९६
ॲड. वंदना चव्हाण १५ मार्च १९९७
वत्सला आंदेकर २० मार्च १९९८
दिप्ती चवधरी १५ मार्च २००२
रजनी त्रिभुवन १५ मार्च २००५
राजलक्ष्मी भोसले १५ मार्च २००७
वैशाली बनकर १५ मार्च २०१२
चंचला कोंद्रे ५ सप्टेंबर २०१३
मुक्ता टिळक १५ मार्च २०१७