PMC Election: अजित पवारांनी धंगेकरांना शिंदेसेनेबरोबर युती करण्याबाबत ग्रीन सिग्नल दिला नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:55 IST2025-12-30T10:53:20+5:302025-12-30T10:55:06+5:30
PMC Election भाजपकडून १५ अधिक १ म्हणजेच १६ जागांचा प्रस्ताव शिंदेसेनेपुढे ठेवला आहे. मात्र, शिंदेसेना २५ जागांवर ठाम आहे.

PMC Election: अजित पवारांनी धंगेकरांना शिंदेसेनेबरोबर युती करण्याबाबत ग्रीन सिग्नल दिला नाही
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना यांच्यामध्ये जागा वाटपावरून वाद सुरू आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनच्या युतीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे भाजपवर दबाव टाकण्यासाठी शिंदेसेनेचे पुणे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावर अजित पवार यांनी शिंदेसेनेबरोबर युती करण्याबाबत ग्रीन सिग्नल दिला नाही, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना यांची युती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. भाजपकडून "सन्मानपूर्वक" जागा न मिळाल्यामुळे शिंदेसेना नाराज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची माजी आमदार धंगेकर यांनी घरी जाऊन भेट घेतली. भाजपकडून १५ अधिक १ म्हणजेच १६ जागांचा प्रस्ताव शिंदेसेनेपुढे ठेवला आहे. मात्र, शिंदेसेना २५ जागांवर ठाम आहे. भाजपकडून शिंदेसेनेला जागा वाटपाबाबत उत्तरे मिळाली नसल्यामुळे शिंदेसेनेने अजित पवारांची भेट घेतली.
दरम्यान पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे जाहीर झाले आहे. तर भाजप आणि शिवसेना शिंदे गट युती म्हणून लढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र शिंदे गटाला जागा कमी दिल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे शिवसेना महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर हे अजित पवारांच्या भेटीसाठी गेले होते.