PMC Election 2026: पिंक मतदान केंद्रावर महिलांचा विशेष उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 19:58 IST2026-01-15T19:58:01+5:302026-01-15T19:58:24+5:30
विशेषतः शहरातील सुशिक्षित तरुण महिला आणि गृहिणींमध्ये या केंद्राबद्दल मोठे आकर्षण दिसून आले. ज्येष्ठ नागरिक आणि तरुणींमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता.

PMC Election 2026: पिंक मतदान केंद्रावर महिलांचा विशेष उत्साह
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी महिला मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून शहरात एकूण १६ पिंक मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती. या मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत होता. या मतदान केंद्रांचे नियोजन पूर्णपणे महिला अधिकारी करत होत्या. या केंद्रावर मतदान करण्यासाठी सकाळी ७:३० पासूनच मोठ्या प्रमाणात महिलांच्या रांगा लागल्या होत्या.
विशेषतः शहरातील सुशिक्षित तरुण महिला आणि गृहिणींमध्ये या केंद्राबद्दल मोठे आकर्षण दिसून आले. ज्येष्ठ नागरिक आणि तरुणींमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. महिला मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी या केंद्रावर सगळीकडे गुलाबी रंगाचे वातावरण पिंक बूथ वर निवडणूक आयोगाकडून करण्यात आले होते. या केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना रांगेत उभे न राहता व्हीलचेअरची सुविधा देत थेट मतदानाची मुभा देण्यात आली तर सर्वांसाठी सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते. या केंद्राबाहेर गुलाबी रंगाचे कापड, फुगे आणि विविध संदेश देणाऱ्या रांगोळी काढून स्वागतार्ह वातावरण तयार केले होते.
महिलांना कोणताही संकोच न वाटता निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी विशेष सुविधा देण्यात आल्या होत्या. पिंक बूथमुळे महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले आहे. विशेषतः पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणी आणि ज्येष्ठ महिलांमध्ये या केंद्रांबद्दल मोठी उत्सुकता दिसून आली. पहिल्यांदा मतदान करण्यासाठी आलेल्या तरुणी पासून ते वयोवृद्ध महिलांना या केंद्रावरील सेल्फी पॉईंट वर मतदान केल्यानंतरचा फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.