PMC Election 2026: पुण्यात काँग्रेस अन् मनसेसोबत झालेली नवी आघाडी उद्धवसेनेला तारणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:06 IST2026-01-01T13:02:01+5:302026-01-01T13:06:05+5:30
PMC Election 2026 एकूणच प्रचारातील मुद्दे, तीनही पक्षांचे नेते, कार्यकर्ते मतदारांना कशा पद्धतीने स्वत:चे मुद्दे पटवून देतील आणि ते किती मतदारांना पटतील, यावर उद्धवसेनेचे भवितव्य अवलंबून राहणार

PMC Election 2026: पुण्यात काँग्रेस अन् मनसेसोबत झालेली नवी आघाडी उद्धवसेनेला तारणार का?
पुणे : महापालिका निवडणुकीला उद्धवसेना पहिल्यांदाच काँग्रेस आणि मनसेसोबत आघाडी करून सामोरे जात आहे. उद्धवसेनेतील सर्व माजी नगरसेवक भाजप आणि शिंदेसेनेत गेले आहेत. त्यामुळे उद्धवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली होती; परंतु माजी आमदार महादेव बाबर आणि माजी नगरसेविका कल्पना थोरवे स्वगृही दाखल झाल्याने कात्रज, कोंढवा या भागात उद्धवसेनेची ताकद पुन्हा वाढली आहे. शिवाय पहिल्यांदाच उद्धवसेना काँग्रेस अन् मनसे हे आघाडी करून महापालिका निवडणुकीला सामोरे जात आहे. त्याचा किती फायदा होणार, हे निकालानंतरच कळेल.
पुणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत उद्धवसेना भाजपबरोबर निवडणुकीला सामोरे गेली होती. शिवाय त्यावेळी शिवसेनेत फूट पडली नव्हती, तरीही केवळ दहा जागा जिंकल्या होत्या. आता शिवसेनेत फूट पडून शिंदेसेना आणि उद्धवसेना हे स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहे. यामुळे नेते आणि कार्यकर्ते यांची विभागणी झाली आहे. दुसरीकडे भाजपचे वारे जोरात वाहत आहे, तसेच सध्या उद्धवसेनेतील सर्वच माजी नगरसेवक भाजप आणि शिंदेसेनेत गेले आहेत. दुसरीकडे उद्धवसेना पहिल्यांदा काँग्रेसला आणि मनसेला सोबत घेऊन महापालिका निवडणूक लढवत आहे. आघाडी झाल्याने ताकद वाढली तरी तीनही पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते निवडणुकीला सामोरे जाताना मतदारांसमोर कोणते मुद्दे मांडणार आहेत, याचा मतदानावर परिणाम होणार आहे, तसेच मनसे आणि उद्धवसेना विभागलेला मतदार आणि कार्यकर्ते एकत्र आणण्यात यशस्वी झाले, तर उद्धवसेनेला चांगल्या जागा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरीकडे हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर अजित पवार गटातून पुन्हा उद्धवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे कोंढवा, तर वसंत मोरेमुळे कात्रज भागात तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. एकूणच प्रचारातील मुद्दे, तीनही पक्षांचे नेते, कार्यकर्ते मतदारांना कशा पद्धतीने स्वत:चे मुद्दे पटवून देतील आणि ते किती मतदारांना पटतील, यावर उद्धवसेनेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.