आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहायला हवा; नाव न घेता अजितदादांना फडणवीसांचा सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 06:42 IST2026-01-06T06:41:42+5:302026-01-06T06:42:16+5:30
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप नेते व अजित पवार यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहायला हवा; नाव न घेता अजितदादांना फडणवीसांचा सूचक इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : अनेकजण महापालिकेत सत्ता असताना आम्ही काय केले, ते विचारत आहेत. त्यांनी आम्हाला विचारण्यापूर्वी आरसा पाहावा आणि आपण काय केले? याचा विचार करावा. मात्र, चर्चा जेवढी मागे जाईल तेवढ्या अडचणी निर्माण होतील, असा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना दिला.
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप नेते व अजित पवार यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अजित पवार विविध सभा व पत्रकार परिषदांमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या सत्ता काळात विकास न होता, भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सोमवारी कात्रज चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाव न घेता, अजित पवार यांना सूचक इशारा देत महापालिका निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार, असा विश्वास व्यक्त केला. तसेच आम्हाला राजकारण नाही तर शहराचा विकास करायचा असल्याचे नमूद केले.
विकास आराखडा तयार
फडणवीस म्हणाले, पुणे हे सांस्कृतिक, औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या देशातील महत्त्वाचे शहर असून, राज्याचे आर्थिक इंजिन आहे. मागील पाच वर्षांत पुणे महापालिकेत सत्तेत असताना शहराचा सर्वांगीण विकास केला आहे.
पुढील पाच वर्षांत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ८० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या योजना राबविण्यासाठी विकास आराखडा तयार केला आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल, रिंग रोड, ५४ किमी भुयारी मार्ग, तसेच इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टिम योजना राबविण्यात येणार आहे. एआय आधारित सीसीटीव्ही, स्मार्ट शाळा आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.