PMC Election 2026: कोणतेही बटन दाबले तरी कमळ चिन्हावर लाईट लागत..;मतदान यंत्रात बिघाडाचा आरोप;मतदारांचा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 19:08 IST2026-01-15T19:02:37+5:302026-01-15T19:08:14+5:30
ईव्हीएम बिघाडामुळे कसबा पेठेतील प्रभाग क्रमांक २५ मध्ये दीड तास मतदान ठप्प

PMC Election 2026: कोणतेही बटन दाबले तरी कमळ चिन्हावर लाईट लागत..;मतदान यंत्रात बिघाडाचा आरोप;मतदारांचा गोंधळ
पुणे : कसबा पेठ विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणारा प्रभाग क्रमांक २५ मधील शुक्रवार पेठ येथील शिवाजी मराठा हायस्कूलमधील मतदान केंद्रावरील खोली क्रमांक ४ मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया सुमारे दीड तास ठप्प झाली. दुपारी २.३० वाजता हा प्रकार घडल्याने मतदानासाठी आलेल्या मतदारांमध्ये मोठा गोंधळ उडाला.
एका मतदाराने, कोणतेही बटन दाबले तरी ‘कमळ’ या चिन्हाची लाईट लागत असल्याचा आरोप केल्यानंतर संशयाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मतदारांमध्ये अस्वस्थता पसरली. काही वेळातच मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची गर्दी वाढली. विविध उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या उपस्थितीमुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली.
राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ) पक्षाच्या उमेदवार रूपाली ठोंबरे पाटील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेश भोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन मशीन तात्काळ बदलण्याची व मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी केली. यावरून काही काळ चर्चा व तक्रारी सुरू होत्या.यावर कोणत्याही तक्रारी मिळाल्या नाही ,असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.अखेर सुमारे तासाभरानंतर, दुपारी ३.३० च्या सुमारास निवडणूक अधिकारी मतदान केंद्रावर दाखल झाले. ईव्हीएमची तपासणी करून तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आणि ३.४५ वाजता मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली.दरम्यान, एक ते दीड तास मतदान बंद राहिल्यामुळे मतदारांना लांब रांगेत उभे राहावे लागले. विशेषतः वयोवृद्ध नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
मतदान केंद्रावर उमेदवारांना बाहेर काढताना काही क्षण गोंधळ निर्माण झाला. मात्र त्वरित अतिरिक्त मतदान यंत्र सुरू केल्याने ८–१० मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आली. मतदान सुरळीत सुरू आहे. विशिष्ट बटनाबाबत किंवा दीड तास गोंधळ झाल्याच्या अफवा असून कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. - कृषिकेश रावले,पोलिस उपायुक्त पुणे शहर