PMC Election 2026: पुण्यात सकाळपासून मतदानाला सुरुवात; काही ठिकाणी मशीन बंद, मतदानाची प्रक्रिया थांबली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 09:38 IST2026-01-15T09:37:53+5:302026-01-15T09:38:04+5:30
PMC Election 2026 पुण्यातून खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे

PMC Election 2026: पुण्यात सकाळपासून मतदानाला सुरुवात; काही ठिकाणी मशीन बंद, मतदानाची प्रक्रिया थांबली
पुणे : पुणे महापालिकेचा रणसंग्राम अखेर अंतिम टप्प्यात आला असून सकाळी ७:३० पासून मतदानाला सुरुवात झाली. त्यामधून पुण्याचे कारभारी ठरणार आहेत. ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी १ हजार १५३ उमेदवार रिंगणात असून, त्यांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे. या निवडणुकीसाठी ९३२ ठिकाणी ४ हजार ११ मतदान केंद्रे आहेत. त्यात ९०६ संंवेदनशील मतदान केंद्रे आहेत.
पुण्यातील अनेक भागातून नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडले आहेत. काही ठिकाणी मतदान केंद्र मशीन बंद असल्यामुळे मतदान प्रक्रिया बंद आहे. तर काही भागात मतदार यादीत गोंधळ झाल्याचे चित्र आहे. प्रभाग २६ मध्ये तासभर मशीन बंद होती. उमेदवारांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यात मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत.
या निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेची युती झाली नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. काँग्रेस व उद्धवसेना - मनसे हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीसाठी ४ हजार ११ मतदान केंद्रे आहेत.
४५ रुग्णवाहिका सज्ज
महापालिका निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे रुग्णवाहिकेसह १५ वैद्यकीय पथके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मतदानाच्या दिवशी पालिकेच्या १५ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १५ क्षेत्रीय कार्यालयाकडे बूथनिहाय स्टाफ, नर्स आणि आशा कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली.