PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वाहतूक बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 15:11 IST2026-01-14T15:09:28+5:302026-01-14T15:11:38+5:30
PMC Election 2026 निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतपेटी वाटप, वाहतूक, तसेच मतदान केंद्र परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत

PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वाहतूक बदल
पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतपेटी वाटप, वाहतूक, तसेच मतदान केंद्र परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. १५ ते १६ जानेवारी दरम्यान वेगवेगळ्या भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
विमानतळ वाहतूक विभागांतर्गत फिनिक्स माॅलमागील रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी विमाननगर चौक, नगर रस्ता या मार्गाचा वापर करावा. विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत टिळक रस्त्यावरील पूरम चौक, टिळक चौक हा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी बाजीराव रस्ता, शास्त्री रस्ता या मार्गाचा वापर करावा. दत्तवाडी वाहतूक विभागातील ना. सी. फडके चौक (निलायम चित्रपटगृह), तसेच सारसबाग परिसरातील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालाकंनी बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक या मार्गाचा वापर करावा. टिळक रस्त्याकडे येणारी वाहतूक देशभक्त केशवराव जेधे चौकातून (स्वारगेट) वळवण्यात येईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली.
हडपस विभागातील शिवसेना चौक ते साने गुरुजी मार्ग वाहतुकीस बंद राहणार आहे. वाहनचालकांनी अमरधाम, माळवाडी, डीपी रस्ता, हडपसर गाडीतळ या मार्गाचा वापर करावा. समर्थ वाहतूक विभागातील नेहरू रस्त्यावरील पाॅवर हाऊस चौक ते संत कबीर चौक, ए. डी. कॅम्प चौक ते जुना मोटार स्टँड या भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी रास्ता पेठेतील शांताई चौक, क्वार्टर गेटमार्गे इच्छितस्थळी जावे. कोरेगाव पार्क भागातील नाॅर्थ मेन रस्ता, महात्मा गांधी चौक परिसरातील रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी कोरेगाव पार्क मुख्य चौक, एबीसी फार्ममार्गे इच्छितस्थळी जावे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करुन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.