PMC Election 2026: मतदानावेळी शहरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 19:50 IST2026-01-15T19:47:23+5:302026-01-15T19:50:07+5:30
जास्त गर्दीची ठिकाणे, संवेदनशील मतदान केंद्रे अथवा ज्या ठिकाणी काही गोंधळ होऊ शकतो अशा ठिकाणी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

PMC Election 2026: मतदानावेळी शहरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त
पुणे : महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाकडून व्यापक बंदोबस्त आणि प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे शहरात गुरुवारी (दि. १५) मतदानाच्या दिवशी कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. जास्त गर्दीची ठिकाणे, संवेदनशील मतदान केंद्रे अथवा ज्या ठिकाणी काही गोंधळ होऊ शकतो अशा ठिकाणी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून शहरातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पंकज देशमुख, राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक झोनच्या पोलिस उपायुक्तांच्या देखरेखीतून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडली.
शहरातील ८८ सेक्टर निश्चित करून संवेदनशील भागात विशेष दक्षता घेण्यात आली होती. पोलिस आयुक्त, सहआयुक्त, ४ अपर पोलिस आयुक्त, १४ पोलिस उपायुक्त, ७ हजार पोलिस अंमलदार व अधिकारी, ३ हजार होमगार्ड, एसआरपीएफच्या ४ कंपन्या, १ हजार ५०० बाहेरून मागवलेले अधिकारी-कर्मचारी, ५०० कर्मचाऱ्यांची दुचाकींद्वारे गस्त, क्यूआरटीच्या ८ टीम तैनात करण्यात आल्या होत्या.
१४ पोलिस उपायुक्त, ३० सहायक पोलिस आयुक्त, १६६ पोलिस निरीक्षक, ७२३ सहायक पोलिस निरीक्षक, तसेच १२,५०० पोलिस अंमलदार तैनात करण्यात आले होते. याशिवाय ३ हजार २५० होमगार्ड आणि एसआरपीएफच्या चार तुकड्या बंदोबस्तासाठी कार्यरत होत्या. मतदान केंद्रांवर वादविवादासह अनुचित प्रकार टाळण्यासाठी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांची पथके दक्ष होती.
पोलिसांकडून ज्येष्ठांसह दिव्यांगाना मदतीचा हात...
गुरुवारी सकाळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून तरुणांसह ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत आपला मताचा अधिकार बजावला. यावेळी अनेक मतदान केंद्रांवर ज्येष्ठ आणि दिव्यांगांना मतदान केंद्रात जाण्यासाठी तसेच मतदान केंद्रातून रिक्षा अथवा कारपर्यंत घेऊन जाण्यासाठी पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात दिला.